Advertisement

रुग्णालयाच्या शौचालयात आढळले मयत अर्भक

प्रजापत्र | Thursday, 11/02/2021
बातमी शेअर करा

बीड- गर्भपिशवी शस्त्रक्रिया आणि गर्भपात प्रकरणात यापूर्वी अनेकदा चर्चेत आलेल्या बीड शहरातील वीर हॉस्पिटलच्या वाहनतळानजीकच्या शौचालयात एक मृत अर्भक आढळून आल्याने खळबळ माजली आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.
शहरातील जालना रोडवर वीर हॉस्पिटल आहे. येथे सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मेडिकलवर कामाला असणारे ओमप्रकाश शेटे हे वाहन पार्किंगमधील सार्वजिनक शौचालयात गेले. त्यांना येथे एक अर्भक दिसले. त्यांनी ही माहिती डॉ.संजय वीर यांना दिली. त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना माहिती दिली. शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवि सानप हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यासह संशयित लोकांची यादी ताब्यात घेतली. तसेच सर्व स्टाफ परिसरातील लोकांची माहिती घेणे सुरू केले. याबरोबरच ज्या लोकांवर संशय आहे, त्यांच्या शोधासाठी पथकेही रवाना केल्याचे सांगण्यात आले.या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एक महिला या ठिकाणी सोनोग्राफीसाठी आली होती, पोलीस तिचाही शोध घेत आहेत.
दरम्यान वीर हॉस्पिटल यापूर्वी अनेकदा गर्भपिशवी शस्त्रक्रिया आणि गर्भपात प्रकरणात चर्चेत आले होते. त्याच रुग्णालयात हा प्रकार घडल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

शोध सुरु
माहिती मिळताच दाखल झालोत. सर्व पंचनामा सुरू आहे. परिसरातील लोकांची चौकशीही केली आहे. संशय असलेल्या महिलेने दिलेल्या पत्यावर तपासणीसाठी पथक पाठविले आहे. कॅमेरेही तपासले आहेत. याचा तपास लवकरच लावू.
रवि सानप
पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे बीड

Advertisement

Advertisement