Advertisement

माजलगावात चोरट्यांचा धुमाकूळ

प्रजापत्र | Thursday, 11/02/2021
बातमी शेअर करा

माजलगाव-शहरातील इंदिरानगर, आयशा नगर, फातिमानगर या भागात चोरट्यांनी गुरुवारी पहाटे धुमाकूळ घालत चार घरफोड्या केल्या. रात्रीतून या चार घरातून तब्बल 90 हजार रुपयांचा ऐवज आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
शहरातील मनूर रोड भागात आयशा नगर, फातिमानगर व इंदिरानगर या वस्त्या एकमेकाला लागून आहेत. या भागातील किराणा दुकानदार शाकेरखान युसुफखान पठाण यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी पहाटे दोन ते साडेतीनच्या दरम्यान प्रवेश करून किराणा दुकानातील गल्यातील रोख तीन हजार रुपये, पॅन्टमधील रोख 25 हजार रुपये व 21 हजार 840 रुपयांचे वनपीस दागिने असा एकूण 49 हजार 840 रुपयांचा ऐवज लंपास केला. पठाण कुटुंबीयांना सकाळी सहा वाजता झोपेतून जाग आली त्यावेळेस चोरी झाल्याचे समजले. 
यासोबतच फातिमानगर भागातीलच समीना शेख रजीयोद्दीन यांनी साखरेचे डब्यात ठेवलेले दोन हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी पळवले. तसेच शेख शमशुद्दीन जमीरउद्दीन यांचे किराणा व बांगडी दुकानातील रोख तेरा हजार रुपये व बेन्टेक्सचे दागिने असा माल चोरून नेला. तर इंदिरानगर भागातील कांताबाई वाल्मिक टाकणखार यांचे घरातील पेटीत ठेवलेले २५ हजार रुपये चोरट्यांनी पळून नेले. या चोऱ्या एकाच टोळीने केल्याची शक्यता असून याप्रकरणी पोलीसांचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक जयराम भटकर यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement