एलसीबीच्या कर्मचार्यांमधील संवादाने पोलीस खात्याची लक्तरे वेशीला टांगली
बीड-पोलीस खात्यावर पैसे घेतल्याचा आरोप नेहमीच केला जातो. मात्र बीडमध्ये स्थानिक गुन्हा शाखेच्या दोन कर्मचार्यांमध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीचा संवाद झाला आहे. पोलिसाच्या नातेवाईकाचा जामीनासाठी पैसे मागितले गेल्यानंतर ‘पोलिसांचे कामच आहे पैसे घेणे, इथे पैसे घेतल्याशिवाय राहूच शकत नाही. पैसे घेतले तर काय बिघडलं’ अशी मुक्ताफळे स्थानिक गुन्हा शाखेत प्रतिबंधात्मक कारवाईचा विभाग सांभाळणार्या एका कर्मचार्याने उधळली आहेत. विशेष म्हणजे या संदर्भात पोलीस निरीक्षकांशी बोला काही तरी फरक पडेल अशी सूचना देताना पूर्वी जेलमधून सुटलेल्या आरोपींसाठी पैसे घेतले जात नव्हते. मात्र आता घेतले जातात अशी निर्लज्ज कबूलीही देण्यात आली आहे. पोलीस दलातील दोन कर्मचार्यांच्या या संवादाची ध्वनीफित व्हायरल झाली असून यामुळे बीड जिल्हा पोलीस दलाच्या इज्जतीचे लक्तरे वेशीला टांगले गेले आहेत.
यापूर्वी देखील बीड जिल्ह्यात अधिकार्यांच्या नावावर पोलीस कर्मचारी पैसे मागत असल्याचे ऑडिओ समोर आले होते. तसेच पेठ बीड मधील एका प्रकरणात एलसीबीला जामीनाला पाठविले तर पाच हजार रुपये लागतात असे एका पोलीस कर्मचार्याने म्हटल होते. मात्र आतापर्यंत अशा प्रत्येक प्रकरणात केवळ कर्मचार्यांवर कारवाई झाली आतापर्यंत एकाही अधिकार्याला अशा प्रकरणात जबाबदार धरण्यात आलेले नाही.
बीड जिल्हा पोलीस दलात बोकाळलेला भ्रष्टाचार सध्या वेगवेगळ्या मार्गाने समोर येत आहे. यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गाड्या सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडीओ समोर आला होता तर पेठ बीड पोलीस ठाण्यातील वेगवेगळ्या कर्मचार्यांच्या ध्वनीफिती व्हायरल झाल्या होत्या. आता तर पोलीस दलातील सर्वात महत्वाची शाखा मानली जाणार्या स्थानिक गुन्हा शाखेतील कर्मचार्यांनी मांडलेले बाजार एका ध्वनीफितीमुळे समोर आला आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या प्रतिबंधात्मक काारवाईचा विभाग सांभाळणार्या सानप नामक कर्मचार्याला स्थानिक गुन्हा शाखेतील दुसर्या एका कर्मचार्याने फोन करुन जेलमधून सुटलेल्या आरोपीच्या प्रतिबंधात्मक जामिनासाठी पैसे मागण्यात आले असून तो आरोपी आपल्याच पोलीस खात्यातील एका कर्मचार्याचा नातेवाईक असल्याचे सांगितले यावर मला कशाला बोलता पीआयला बोला आणि पैसे मागितले तर बिघडले कोठे, पोलिसांचं कामच आहे पैसे घ्यायचं. पैशाशिवाय कोणी जगू शकतो का अशा प्रकारे उत्तरे दिल्याचे या ध्वनीफितीत ऐकायला मिळत आहे. पूर्वी जेलमधील सुटलेल्या आरोपींकडून पैसे घेतले जात नव्हते मात्र परवापासून हे सुरु झाले आहे. असे निर्लज्ज उत्तरेही देण्यात आले आहेत. यामुळे बीड जिल्हा पोलीस दलात प्रतिबंधात्मक कारवाईसाठी भ्रष्टाचार किती बोकाळला आहे आणि पोलिसांनी याचे दुकानच कसे मांडले आहे हे समोर आले आहे.
प्रतिबंधात्मकचा हट्ट एलसीबीकडेच का?
सीआरपीसी अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईचे अधिकार कार्यकारी दंडाधिकार्यांना आहेत. मुळात हे अधिकार महसूल अधिकार्यांकडे असतात. मात्र अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षकांना हे अधिकार वापरता येतात. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल अशा प्रसंगात त्यांनी हे अधिकार वापरने अपेक्षित असते मात्र बीड जिल्ह्यात सातत्याने प्रतिबंधातमक कारवाईची सर्व प्रकरणे थेट एलसीबीकडे नेली जातात. यापूर्वी देखील अशा प्रकरणात जामीन देण्यासाठी पैसे घेतले गेल्याचा जाहीर आरोप झाला होता. ही प्रकरणे तहसीलदारांसमोर उपस्थित करुन कारवाई करणे शक्य आहे. अशा प्रकरणातही एलसीबीकडेच प्रकरणे पाठविण्याचा अट्टाहास केला जातो. जर गुन्हेगारांना जरब बसावी हा या मागचा हेतू असेल तर किती प्रकरणात एलसीबीने जामीन दिला आणि किती प्रकरणात कोठडी सुनावली याचा एकदा हिशोब मांडणे गरजेचे आहे. जामीन द्यायचाच आहे तर मग तहसीलदाराने दिला तर काय बिघडते असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
कर्मचार्यांवर कारवाई अधिकारी मात्र सेफ
आतापर्यंत ज्या-ज्या प्रकरणात भ्रष्टाचाराच्या संर्भाने चित्रफित किंवा ध्वनीफित समोर आली त्या प्रत्येक प्रकरणात केवळ कर्मचार्यांवर कारवाई झाली आहे. विषय शिवाजीनगरच असेल किंवा पेठबीड ठाण्यातील तीन-चार कर्मचार्यांसंदर्भातला अधिकार्यांवर कारवाई झाली नाही. आता एलसीबीच्या कर्मचार्यांच्या संवादात अधिकार्यांचा उल्लेख आला आहे. पोलीस दलात कोणताच कमर्चारी केवळ स्वत:च्या अधिकारात पैशाची मागणी करत असेल यावर विश्वास बसणे अवघड आहे मग कर्मचार्यांवर कारवाई करणारे पोलीस खाते अधिकार्यांना सेफ का ठेवत आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
चौकशीकरुन कारवाई करु
दरम्यान या संदर्भात पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्याशी संपर्क साधला असता आपणही ती ऑडिओ क्लिप ऐकली आहे यातील सानप नावाच्या कर्मचार्याला तीन दिवसांपूर्वीच नियंत्रण कक्षालापाठविण्यात आले आहे त्याच्याबद्दल यापूर्वी अनेक तक्रारी होत्या त्याची चौकशी सुरु असून त्यात आता हा मुद्दा देखील घेतला जाईल त्यानंतर कारवाई करु असे म्हटले आहे.