परळी दि.२० (प्रतिनिधी): अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संजय जाधव यांच्यावर रविवार (दि.१९)रोजी रात्री उशिरा सहा जणांच्या टोळक्याने हल्ला केला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवार (दि.१९)रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास संजय जाधव हे गोवर्धन हिवरा ते सिरसाळा रोडवर असलेल्या आपल्या शेताकडून घराकडे जात होते. ते गोवर्धन शिवारात आले असता, दबा धरून बसलेल्या सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने जाधव यांच्यावर वार केले. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जाधव यांना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाजार समितीच्या माजी पदाधिकाऱ्यावर, असा हल्ला झाल्याने भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, या हल्ल्यामागे नेमके कारण काय असावे याबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

प्रजापत्र | Monday, 20/04/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
