Advertisement

अंबाजोगाईत वैद्यकीय विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 06/04/2026
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.६(प्रतिनिधी): येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात त्वचा रोग विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मंदार उमेश दाभाडे (वय २८) या विद्यार्थ्याने आज पहाटे राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरासह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मूळचा पुणे येथील रहिवासी असलेला मंदार हा या महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता.

    अधिक माहितीनुसार, मंदार हा अंबाजोगाई ते चनई रोडवरील संत रविदास नगर भागातील एका इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर भाड्याने राहत होता. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्याने कालच आपल्या घरमालकाला फोन-पे द्वारे तीन हजार रुपये घरभाडे पाठवले होते. त्यानंतर आज पहाटे पाचच्या सुमारास त्याने आपल्या भावाला मोबाईलचा पासवर्ड संदेशाद्वारे पाठवला आणि खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मंदारने गळफास घेण्यापूर्वी तोंडावर रुमाल बांधला होता, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.घटनेची माहिती मिळताच स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच पोलीस दलही घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फॉरेन्सिक लॅबची टीम देखील पुराव्यांच्या संकलनासाठी पाचारण करण्यात आली आहे. मंदारसारख्या अत्यंत मनमिळाऊ, होतकरू विद्यार्थ्याने ऐन उमेदीच्या काळात हे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement