Advertisement

अश्लील व्हिडिओ पाहून चिमुरडीवर अत्याचार

प्रजापत्र | Friday, 27/03/2026
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.२७ (प्रतिनिधी): अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या दोन वर्षे पाच महिने वयाच्या चिमुरडीवर तिच्याच १५ वर्षीय नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले
आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून आरोपीने हे कृत्य केले असून, पीडितेचा मृत्यु झाल्यानंतर शवविच्छेदन अहवालातून हा प्रकार उघड झाला आहे.

    अंबाजोगाई तालुक्यातील एका गावातील ही चिमुरडी मंगळवार (दि.१७) मार्च २०२६ रोजी घरासमोरील पाण्याच्या हौदात पडून मयत झाली होती. सुरुवातीला हा केवळ अपघात वाटत असल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. मात्र, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन करताना मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निदर्शनास आणून दिले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सखोल तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले आणि त्यांच्या पथकाने अत्यंत गोपनीयरीत्या माहिती गोळा केली. पीडितेच्या मृत्युनंतर संशयित आरोपी असलेला तिच्या आत्याचा मुलगा (वय १५) हा तीन दिवस जेवला नव्हता आणि सतत रडत होता, अशी माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली. या संशयावरून पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पीडितेच्या मृत्यूपूर्वी आठ दिवस अगोदर आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या दुचाकीवर बसवून नेले आणि घरात कोणी नसताना मोबाईलवरील अश्लील चित्रफीत पाहून तिच्यावर अत्याचार केले. त्यापूर्वी देखील त्याने तिच्यावर एक वेळेस अत्यावर केल्याची कबुली दिली या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(१) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम २०१२ च्या कलम ४, ६, ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्यादी होऊन एका गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पिंक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधवर यांच्याकडे सोपवण्यात आला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement

Advertisement