अमेरिका : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. इराणवरील लष्करी हल्ले तात्पुरते थांबवण्यात आले असून, पुढील निर्णय चर्चेनंतर घेतला जाईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.
पावर प्लांटवरील हल्ले ५ दिवसांसाठी पुढे ढकलले
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, गेल्या दोन दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून, पुढील एक आठवडा ही चर्चा सुरू राहणार आहे. मी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला इराणच्या वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे सर्व लष्करी हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली. तसेच, मध्यपूर्वेतील तणाव पूर्णपणे संपवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये गंभीर चर्चा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
होर्मुज सामुद्रधुनीवरून आधी दिली होती धमकी
विशेष म्हणजे, या घोषणेच्या एक दिवस आधीच ट्रम्प यांनी इराणला स्ट्रेट ऑफ होर्मुझ बाबत कडक इशारा दिला होता. त्यांनी सांगितले होते की, जर इराणने ४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली नाही, तर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले केले जातील. मात्र आता चर्चेची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे अमेरिकेने हल्ले तात्पुरते थांबवले आहेत.
युद्ध थांबण्याची शक्यता?
अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू झाल्यामुळे युद्धविरामाची शक्यता निर्माण झाली असली, तरी अंतिम निर्णय पुढील चर्चेनंतरच घेतला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषकांच्या मते, जर चर्चा यशस्वी झाली तर मध्यपूर्वेतील तणाव कमी होऊ शकतो, अन्यथा पुन्हा लष्करी कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे.

