Advertisement

टिकरी सीमेवर शेतकरी आंदोलकानं घेतला गळफास

प्रजापत्र | Sunday, 07/02/2021
बातमी शेअर करा

नवी दिल्ली-नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या एका शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेला शेतकरी काही दिवसांपूर्वीच शेतकरी आंदोलनात सामील झाला होता. आत्महत्या केलेला शेतकरी शनिवारी रात्री अतिशय निराश होता, असं त्याच्यासोबत असणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितलं. टिकरी सीमेवर या शेतकऱ्यानं रात्री उशिरा गळफास घेतला. 
आत्महत्या केलेला शेतकरी जींदच्या सिंहवाला येथील रहिवाशी असल्याचं सांगितलं जात आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव दरियाव सिंह असून तो ५० वर्षांचा होता. टिकरी येथील एका बस स्टँडजवळील झाडाला प्लास्टिकच्या रशीनं गळफास घेत दरियाव यांनी आत्महत्या केली आहे. आज सकाळी शेतकऱ्यांना दरियाव यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला आणि एक सुसाईड नोट देखील आढळून आली. 

सुसाइड नोटमध्ये मोदी सरकारचा उल्लेख
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यानं सुसाईड नोटमध्ये मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे. "भारतीय किसान युनियन झिंदाबाद. मोदी सरकार केवळ तारखांवर तारीख देत आहे. हे काळे कायदे केव्हा रद्द होतील याची काहीच शाश्वती नाही", असं लिहून शेतकऱ्यानं आत्महत्या केलीय.

Advertisement

Advertisement