Advertisement

सुप्रिया सुळेंसह अनेक खासदारांना रोखल 

प्रजापत्र | Thursday, 04/02/2021
बातमी शेअर करा

 दिल्ली- संसदेचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. दरम्यान, संसदेचं आजचं कामकाज सुरु होण्यापूर्वी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी पोहोचले आहेत. मात्र, या सर्वांना दिल्ली पोलिसांनी या सीमेवरच अडवलं आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

शेतकरी आंदोलनाला भेट देण्यासाठी निघालेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, केरळमधील अनेक खासदार आहेत. विविध राज्यातील दहा पक्षांचे खासदार यानिमित्ताने एकत्र आले आहेत. सर्व खासदार मिळून पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. यासर्वांना पोलिसांनी तीन किमी आधीच रोखलं आहे. पोलिसांची ही कृती म्हणजे देशाच्या लोकशाहीवर होत असलेला मोठा हल्ला असून त्यावर कोणी बोलत नाही असं पंजाबमधील एका खासदारानं प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही इथे गडबड करायला आलोय की काय अशा पद्धतीने प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा आणि बॅरिकेट्स लावून आम्हाला रोखण्यात आलं आहे. अन्नदाता सुखी भवं असे आपल्यावर संस्कार झालेले आहेत. मात्र, शेतकऱ्यांशी सरकार ज्या पद्धतीनं वागतंय हे अतिशय दुर्देवी आहे. आम्ही संसदेत मागणी करतोय की यावर वेगळी चर्चा व्हावी. पण सरकार यासाठी तयार नाही. आम्ही शेतकऱ्यांशी चर्चाच करु नये, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पाकिस्तान किंवा चीनच्या सीमेवरही नसेल इतकी कठोर बंधन इथं घातली आहेत. असंवेदनशील हे सरकार आहे, सरकारमधील लोकांना शेतकरी आपला वाटत नाही. आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही तर आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे जाणार आणि इथली परिस्थिती समजावून सांगणार आहोत.”

Advertisement

Advertisement