पुणे - लहान मुलाच्या खेळाच्या भांडणातून १३ वर्षांच्या मुलाने ११ वर्षांच्या मुलाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २९ जानेवारी रोजी दुपारी केळेवाडीमध्ये घडली होती. कोथरूड पोलिसांनी १३ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. मैदानात खेळत असताना झालेल्या वादात ढकलून दिल्यानंतर डोक्यावर पडून मुलगा जखमी झाला. घरचे रागवतील म्हणून त्या मुलाच्या डोक्यात आणखी दगड घालून त्याला अर्धा गाडल्याचे समोर आले होते. विश्वजित विनोद वंजारी (वय ११, रा. केळेवाडी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. विश्वजित हा २९ जानेवारी रोजी सायंकाळी खेळायला जातो, असे सांगून बाहेर गेला होता. त्यानंतर तो परत आला नव्हता. त्याच्या आई-वडिलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. कोथरूड पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. त्याच्या घरापासून सुमारे ५०० मीटरवर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मोकळ्या प्लॉटमध्ये दगडाने त्याचा मृतदेह झाकून ठेवल्याचे ३१ रोजी पोलिसांना आढळले होते.
पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता.कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मेघश्याम डांगे यानी सांगितले, मुलाचा कसून शोध सुरू होता. त्याचा मृतदेह आढळल्यानंतर डोक्याला मार लागल्यामुळे खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आरोपीचा शोध सुरू होता. तपास करताना १३ वर्षांच्या मुलावर संशय निर्माण झाला. त्यानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले. विश्वजित व आरोपी अल्पवयीन मुलगा हा मित्र होते. दोघे एकत्र खेळायचे. त्या वेळी त्यांच्यात वादावादी होत होती. विश्वजित याने त्याला चिडविले. पकडापकडीत आरोपीने विश्वजितचे नाक दाबले.
त्यानंतर त्याला धक्का दिला. त्या ठिकाणी असलेल्या विटांवर तो पडल्यामुळे डोक्याला गंभीर जखम झाली. त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. त्यामुळे आरोपी मुलगा घाबरला. घरचे रागावतील म्हणून त्याने आणखी एक दगड त्याच्या डोक्यावर टाकला. तो दिसू नये म्हणून त्याच्या अंगावर बाजूने दगडे रचली. त्या ठिकाणी सिंमेटचा राडारोडा टाकल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुलास ताब्यात घेतले असून त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे.