केज दि.३०(प्रतिनिधी): तालुक्यातील घाटेवाडी येथील किरण शिवाजी धुमक यांना निष्काळजीपणाचा फटका बसला. बँकेतून चार लाख रुपये काढून गावाकडे जात असताना थोडा वेळ चहा पिण्यासाठी थांबले असता, मोटारसायकलच्या हँडलला अडकवलेली पैशांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
बुधवार (दि.२८) ऑगस्ट रोजी दुपारी किरण धुमक व त्यांचा चुलत भाऊ प्रदीप धुमक हे दोघे मोटारसायकलने गावाकडे जात होते. संध्याकाळी मस्साजोग येथे ‘चहा प्रेमी’ हॉटेल समोर मोटारसायकल उभी करून किरण धुमक यांनी पैसे असलेली पिशवी हँडलला अडकवली आणि दोघेही चहा पिण्यास गेले. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पिशवी चोरून नेली.चोरीचा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र काहीच निष्पन्न झाले नाही. किरण धुमक यांनी केज पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जावेद कराडकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.