यवतमाळमध्ये एका शिक्षकाच्या निर्घृण हत्येची घटना समोर आली आहे. मुख्याध्यापक पत्नीने अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने आपल्या पतीचा काटा काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापिकेला अटक केली असून तीनही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
अधिक माहितीनुसार यवतमाळ शहरालगतच्या चौसाळा जंगलात १५ मे रोजी जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी याचा तपास सुरु केला. तपासात असे आढळून आले की, मुख्याध्यापक पत्नीनेच पतीवर विषप्रयोग करून त्याचा खून केला आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने पहाटे मृतदेह जंगल परिसरात जाळून टाकला.पोलिसांच्या माहितीनुसार शंतनू अरविंद देशमुख (३२, रा. सुयोगनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे तो इंग्लिश मीडियम स्कूलम शिक्षक होता, तर त्याच ठिकाणी पत्नी निधी () ही मुख्याध्यापिका होती. प्रेमविवाह असल्याने ते आई-वडिलांपासून विभक्त राहत होते. शंतनू १३ मेच्या सायंकाळपासून बेपत्ता होता. त्याचा जंगलात मृतदेह मिळाल्याची माहिती पसरताच शंतनूसोबत बारमध्ये असणाऱ्या मित्रांमध्ये कुजबुज सुरू झाली. पोलिसांनी मित्रांची चौकशी सुरु केली. त्यावेळी एकाच्या मोबाइलमध्ये शंतनूचा १३ मे रोजीचा फोटो दिसला. त्याच्या अंगातील शर्ट आणि मृतदेहाजवळील कापडाचा तुकडा है दोन्ही सारखेच होते. यावरुनच पोलिसांची तपासाची दिशा निश्चित झाली.
तीन विद्यार्थी ताब्यात
पोलिसांनी निधीचीही चौकशी केली पण सुरुवातीला निधीने पोलिसांना गुंगारा दिला. मात्र, घरात आढळलेली अंडरवेअर व मृतदेहाच्या अंगातील अंडरवेअर एकाच कंपनीची असल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखविताच निधीने हत्येचा संपूर्ण घटनाक्रमाची कबूली दिली. मृतदेह जाळण्यास मदत केलेल्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गूगलवरून तयार केले विष
निधीच्या कबुलीनुसार, शंतनू दारूच्या आहारी गेला होता. त्याच्यापासून सुटका मिळविण्यासाठी तिने त्याच्या हत्येचा कट रचला. यासाठी तिने विष कसे तयार करायचे याची माहिती गूगलवरुन घेतली. दारुच्या नशेत असलेल्या शंतनूला ते विष ज्यूसमधून पाजले यात त्याचा मृत्यु झाला, यानंतर तिने तीन विद्यार्थ्यांच्या मदतीने पहाटे जंगलात मृतदेह जाळला.