पुणे:भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवलेल्या (Rain Update Maharashtra) अंदाजानुसार, २२ मे रोजी अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे हवामानीय क्षेत्र उत्तरेकडे सरकत असताना त्याची तीव्रता हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. \
सध्या या क्षेत्रामुळे चक्रीवादळ तयार होणार की नाही याबाबत निश्चितता नसली, तरी या प्रणालीमुळे हवामानात मोठा बदल होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाचा इशारा
IMD नुसार, अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र उत्तरेकडे सरकताना तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे २० ते २५ मे दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि केरळच्या काही भागात मुसळधार पाऊस पडेल. विशेषतः २०-२१मे रोजी कर्नाटकात आणि २१ मे रोजी कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि घाटमाथा परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची आणि गारपिटीची शक्यता आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशीव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे ३०-४०किमी ताशी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. ४८ तासांनंतर या भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.