पुणे : प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक (Jayant Narlikar) प्रा.जयंत नारळीकर यांचे (Pune) पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी आज मंगळवार (दि. २०) रोजी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने भारताने एक तेजस्वी वैज्ञानिक आणि विज्ञानसंस्कृतीचा पुरस्कर्ता गमावला आहे.
जयंत नारळीकर (Jayant Narlikar) हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ होते. केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले होते. टाटा मूलभूत संशोधन संस्थेत कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी पुण्यात 'आयुका' (आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिकी केंद्र) या संस्थेच्या स्थापनेत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या वैज्ञानिक योगदानाबरोबरच, ते आपल्या रसाळ आणि समजेल अशा भाषेतील मराठी विज्ञानकथांसाठीही ओळखले जात होते.विज्ञानाच्या क्षेत्रात भरीव कामगिरीसह साहित्यविश्वातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. २०२१ साली नाशिक येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्यांच्या निधनामुळे विज्ञान, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.