मुंबई : एप्रिल महिन्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात नागपूरसह बहुतांश जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. अशातच नुकतेच पूर्व विदर्भातील (East Vidarbha) अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावत एकच दाणादाण उडवली आहे. अचानक आलेले या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचे संकट ताजे असताना आता वैदर्भीयांची काहीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचा अंदाज नागपूर वेध शाळेकडून देण्यात आला आहे. तर संभाव्य इशारा लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा दिला आहे. यात विशेष करून पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांना या उष्णतेच्या लाटेचा अधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भाच्या तापमानाचा विचार करायचं झाल तर अकोल्याचे तापमान ४४.२ अंशावर पोहोचलंय. तर अकोला विदर्भातील सर्वात हॉट जिल्हा ठरला आहे. तर नागपुरात या मोसमातील उच्चांकी ४३अंश तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तर ढगाळ वातावरणातही अकोल्याचा तापमान ४४.२ अंश नोंदविण्यात आले आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. यात अमरावती ४३.६, यवतमाळ येथे ४३.६, चंद्रपूर ४२.६, वर्धा ४२.१ तर वाशिममध्ये ४२.६ अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास भंडाऱ्याच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळे काही घरांवरील पत्रे उडालीत. तर, काही ठिकाणी वृक्ष कोसळल्याची घटना घडली. यामुळं काही गावातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना रात्री अंधारात राहावं लागलं. वरळी वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी आंबे गळून पडल्यानं आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
तर दुसरीकडे, यवतमाळच्या वणी येथे वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर कडाक्याचे ऊन तापले असताना अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. तापमानाचा पारा चाळीशी पार असून कडक उन्हामुळे घराबाहेर निघणेही अवघड ठरत आहे, अशात आलेल्या अवकाळी पावसामुळे काहीसा गारवा निर्माण झाला. मात्र रात्रीच्या वेळी नागरिकांना गर्मीचाच सामना करावा लागतोय.