Advertisement

ऊर्जा कंपनी पीडित शेतकऱ्यांसाठी आ. नमिता मुंदडा तरी पुढे आल्या

प्रजापत्र | Friday, 18/04/2025
बातमी शेअर करा

ऊर्जा कंपनी पीडित शेतकऱ्यांसाठी आ. नमिता मुंदडा तरी पुढे आल्या
केजमधील आवादाच्या मनमानीविरोधात दिले पत्र
बीड दि. १८ (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्यात ऊर्जा कंपन्यांच्या मनमानी आणि शेतकरी लुटीच्या धोरणाविरोधात बोलायला एकही लोकप्रतिनिधी तयार नसताना आता शेतकऱ्यांच्या तक्रारी घेऊन केजच्या आ. नमिता मुंदडा पुढे आल्या आहेत. केजमध्ये आवादा कंपनी नियमबाह्य मार्गाने शेतकऱ्यांच्या शेतातून विजेच्या तारा ओढत असल्याची बाब त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कळविली असून या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यात ऊर्जा कंपन्यांची मनमानी रोजचीच झाली आहे. प्रशासन आणि पोलिसांनी ऊर्जा कंपन्यांचीच पाठराखण करायची हे जणू ठरवून टाकले आहे. त्यामुळे कंपनीचे गुंड सर्रास शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. कंपन्या मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेतातून विजेच्या तारा ओढत आहेत. मात्र या साऱ्या प्रकाराबाबत जिल्ह्यातील दोन्ही खासदार आणि सुमारे ९ आमदार (६ विधानसभा सदस्य , ३ विधानपरिषद सदस्य ) मात्र मूग गिळून बसलेले होते. आता यातील केजच्या आमदार नैमता मुंदडा शेतकऱ्यांसाठी समोर आल्या आहेत. केजमध्ये आवादा कंपनीचे लोक सर्व्हेक्षण बाजूला ठेवून गरीब शेतकऱ्यांच्या शेतातून विजेच्या तारा बळजबरीने आणि नियमबाह्य पद्धतीने ओढत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल आ. मुंदडा यांनी घेतली आहे. त्यांनी या संदर्भात बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले असून या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

Advertisement