केज-मागच्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून केजमध्ये तर अक्षरशः दरोडेखोरांनी उच्छादच मांडला असल्याचे चित्र आहे.आठ दहा दिवसापूर्वी केजच्या बसस्थानकातून एका महिलेच्या साहित्याची चोरी झाली होती , ते ताजे असतानाच मंगळवारी (दि.१५) नेकनूरच्या एका महिलेचे तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण भरदुपारी लंपास करण्यात आले.सर्वात वर्दळीचे ठिकाण असलेल्या बसस्थानकात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली.सध्या केज बसस्थानक चोरट्यांना आंदण दिले की काय असा प्रश्न आता उपस्थितीत होत आहे.
मागच्या एक ते दीड महिन्यांपासून केजच्या बसस्थानक परिसरात सोने लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे.अगदी आठ ते दहा दिवसांपूर्वी याच बस स्थानकातून तीन ते साडेतीन तोळे सोने एका महिलेचे लंपास करण्यात आले होते.यापूर्वीही तिथेच सोने चोरीच्या घटना घडत असताना आता पुन्हा एकदा पोलिसांच्या दुर्लक्षामुळे मंगळवारी दुपारी शबाना अली शेख (वय-४०) या महिलेचे तीन तोळ्याचे गंठण लंपास करण्यात आले.केज ते कळंब या बसमध्ये बसत असताना भर दुपारी १.१५ च्या दरम्यान ही घटना घडली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे कळते.
सारा गाव 'मामा' चा,पण एक नाही कामाचा
पोलिसांबद्दल सामान्यांना एक प्रकारचा विश्वास असतो,अगदी पोलीस 'मामा' म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.केजमध्ये देखील पोलिसांना 'मामा' म्हणण्याची मोठी परंपरा आहे.भलेही रहिवासी 'स्थानिक' चे नसतील,पण त्यांच्यावर शिक्का मात्र 'स्थानिक' सारखाच असलेले अनेक लोक पोलीस दलात कार्यरत आहेत.असे असताना जर चोऱ्या आणि लूटमार थांबणार नसेल तर सामान्यांना सारा गाव 'मामा' चा पण एक नाही कामाचा म्हणण्याशिवाय काय पर्याय असणार आहे.
(क्रमशः)