बीड दि. ५ (प्रतिनिधी ) : अद्ययावत आरोग्य सेवा आणि त्यातही गुंतागुंतीच्या आजारावर उपचार केवळ महानगरमध्येच मिळतात आणि सारे शोध देखील महानगरातच लागतात या संकल्पनेला छेद देण्याचे काम अनेक वर्षांपासून केजमध्ये होत आहे. बालरोग विषयातील अत्यंत जोखमीच्या, गुंतागुंतीच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यात हातखंडा असलेल्या योगिता बालरुग्णालयाच्या डॉ. दिनकर राऊत यांनी बीड जिल्ह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोचला आहे. त्यांच्या बालकांमधील जन्मजात चयापचय दोष (आयईएम ) मधील मॅपल सिरप युरीन डिसीज या अतिदुर्मिळ आजारावरील उपचार आणि शोध निबंधास कंटेनरची पेडीयाट्रिक्सच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये (आयजेसीपी) स्थान मिळाले आहे. केज सारख्या ग्रामीण भागात राहून वैद्यकीय व्यवसाय करत असताना मिळालेले हे यश निश्चितच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद असे आहे.
बालरोग क्षेत्रात जन्मजात चयापचय दोष (आयईएम ) हा आजार अत्यंत दुर्मिळ असा मानला जातो. अतिदुर्मिळ असल्याने ते उपचारासाठी देखील एक आव्हान असते. केज तालुक्यातील योगिता बालरुग्णालयात असा एक रुग्ण दाखल झाला होता. त्या रुग्णाला जन्मल्याचा आठव्या दिवशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जन्मल्यानंतर पहिले सहा दिवस व्यवस्थित असणारा रुग्ण नंतर मात्र अस्वस्थ झाला. त्या बालकाच्या मात्यापित्याच्या एका नवजात बालकाचे असेच दहाव्या दिवशी निधन झाले होते , हा इतिहास असल्याने या बालकाच्या उपचाराच्या संदर्भाने अर्थातच मोठे आव्हान निर्माण झालेले होते. केज सारख्या ठिकाणी उपलब्ध तपासण्या करण्यात आल्या , मात्र त्यातून निदान होत नव्हते. एमआरआय करण्यासारखी बालकाच्या कुटुंबाची परिस्थिती नव्हती. मात्र एबीजीच्या अहवालावरून हा जन्मजात चयापचय दोष (आयईएम ) असू शकतो असे लक्षात येत होते. त्यावरून मग डॉ. दिनकर राऊत आणि त्यांची सारी टीम कामाला लागली. आता हा रुग्ण त्यांच्यासाठी आव्हान होता. एकतर ग्रामीण भागात संसाधने कमी असतात , त्यात असा दुर्मिळ रोग, कोणी फार काही सांगणारे नाही, मात्र या रोगावर डॉ. दिनकर राऊत आणि त्यांच्या टीमने केजमध्येच उपचार केले. तसेच पुढील काळातील प्रसुती संदर्भात देखील समुपदेशन केले.
त्या आजाराची, उपचारांची माहिती देणारा शोध निबंध डॉ. दिनकर राऊत यांनी लिहिला आणि साहजिकच हा जागतिक पातळीवरील दुर्मिळ आजार असल्याने त्यांच्या या शोध निबंधाला कंटेंपररी पेडीयाट्रिक्सच्याआंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये (आयजेसीपी)स्थान मिळाले आहे. हा शोध निबंध जन्मजात चयापचय दोष (आयईएम ) या आजारावर उपचार आणि अधिकच्या संशोधनासाठी बालरोगतज्ञांना मार्गदर्शक ठरणार आहे. केज सारख्या ग्रामीण भागातील एका वैद्यकीय व्यवसायिकाला या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता मिळाली आहे. आपल्या क्षेत्राबद्दल समर्पण आणि टोकाच्या आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी असेल तर काय होऊ शकते याचे हे उदाहरण आहे. महानगरीय क्षेत्रात, कॉर्पोरेट रुग्णालयात रुग्णसेवेच्या दुर्दशेचे दशावतार समोर येत असताना केजच्या योगिता नर्सिंग होमचे डॉ. दिनकर राऊत ,डॉ. सागर वाल्हेकर ,डॉ. अंजनी मिश्रा ,डॉ. रचना सिंग यांचे हे यश ग्रामीण भागातील प्रतिभा किती उज्वल आहे हे दाखवायला पुरेसे आहे.
२४ आठवड्याच्या बालकाला मिळाले होते जिवदान
यापुर्वी याच रुग्णालयात एक मुदतपूर्व प्रसुती (अवघे २४ आठवडे) चे बालक दाखल झाले होते. त्याचे वजन देखील केवळ ६०० ग्रॅम होते. त्याच्यावर उपचाराचेही एक मोठे आव्हान होते. योगीता बाल रुग्णालयाने ते पेलले. त्या बालकावर उपचार करुन त्याला जिवदान दिले. आता ते बालक ३ वर्षाचे झाले आहे. ६०० ग्रॅम वजनाच्या बालकाला जिवदान मिळण्याचे किमान मराठवाड्यातले तरी हे पहिलेच उदाहरण.