मुंबई : राज्यात मागील दोन दिवसांपासून (Maharashtra Weather) अवकाळी पावसामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे, मात्र अवकाळीने धुमाकूळ घातला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता वर्तविली असून, अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मार्च महिन्यात उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मार्च महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली होती. पण एप्रिलच्या सुरुवातीला राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तापमानात काही अंशी घट झाली आहे. हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खान्देश,विदर्भ (Maharashtra Weather) आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असं म्हटलं आहे.
हवामान विभागाने अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, (Beed)बीड, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस तसेच गारपिटीची शक्यता आहे.
बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, अकोला, भंडारा, गडचिरोली, सांगली, कोल्हापूर, जिल्ह्यांना २ एप्रिलसाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि खान्देशातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून कमाल तापमानात अंशतः घट झाली आहे. पुण्यात पुढचे २ दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविणिण्यात आला आहे.