गडचिरोली : जिल्ह्याच्या सीमेवरील छत्तीसगडमध्ये जवान (Chhattisgarh Encounter in Sukma forest) व माओवाद्यांत जोरदार धुमश्चक्री झाली, यात १६ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. सुकमा जिल्ह्यातील केरलापालच्या जंगलात हा थरार घडला. (encounter) मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सुकमा जिल्ह्याच्या (gadchiroli) केरलापाल जंगल परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी गोळा झाल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यावरून सुकमा पोलिस दलाचे डीआरजी पथक आणि बिजापूर जवानांनी २८ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान सुरू केले होते. दरम्यान, २९ मार्चला सकाळी ८ वाजताच्या सुमारास पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. यात १६ नक्षलवादी ठार झाले. तर दोन डीआरजी जवान जखमी झाले. अजूनही चकमक सुरु असल्याने मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळावरून १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्र व दारूगोळा ताब्यात घेण्यात आला आहे. परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले आहे.