जालना : वाळू माफियांचा हैदोस किंवा वाळू माफियांकडून सातत्याने वाळू उपसा करताना गुंडगिरी व दहशत माजवली जाते. अनेकदा महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखील वाळू माफियांकडून हल्ला, मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. वाळू हा विषय पोलीस खात्यापेक्षा महसूल खात्याच्या अधिपत्याखाली येतो. त्यामुळे, वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांना बहुतांशवेळा जीव मुठीत धरुन कारवाई करावी लागते. नुकतेच, जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूरच्या महिला तहसीलदारावर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रतिभा गोरे असं महिला तहसीलदाराचं (Tehsildar) नाव असून त्यांच्या फिर्यादीवरुन वाळू माफियांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दुधना नदी पात्रात वाळू माफियांनी तहसीलदारावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील दुधना नदीपात्रात वाळू माफियावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी सात आरोपी विरोधात परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी अद्याप फरार आहेत. स्वतः तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी परतुर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.