किल्लेधारूर दि.२७(वार्ताहर) धारूर शहरातील माजलगाव रस्त्यावर असलेल्या होलसेल किराणा मालाचे दुकान अज्ञात चोरट्यानी फोडून गोडतेलाचे डब्बे व नगदी पैसे असा सव्वालाख रुपयाचा माल चोरून नेला. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशन मध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.
धारूर शहरातील भरवस्तीतील वर्दळीच्या ठिकाणी माजलगाव रस्त्यावर हुतात्मा स्मारका समोर तिरूपती ट्रेंडीग कंपनी हे होलसेल किराणा माल विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी पहाटे दुकानाचे दक्षिणे कडील शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील गोडतेलाचे पंधरा किलोचे ६० डब्बे व नगदी पैसे असा एक लाख पंचेवीस हजार आठशे रुपयाचा माल चोरून नेला. सकाळी चोरी झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी अक्षय भावठाणकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप डोलारे हे करत आहेत. घटनास्थळी पोलीस उपाधिक्षक भगवानराव सांवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी भेट देऊन पहाणी केली. हि चोरीची घटना भरवस्तीत व रस्त्या वर झाल्याने मात्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.