Advertisement

कन्नड येत नसल्यामुळं मराठी एसटी चालकाच्या तोंडाला फासलं काळं

प्रजापत्र | Saturday, 22/02/2025
बातमी शेअर करा

कोल्हापूर : कर्नाटकातील चित्रदुर्ग (Chitradurga) परिसरात काल महाराष्ट्राची एसटी (Maharashtra ST) अडवून एसटी चालकाला कन्नड रक्षण वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. या निषेधार्थ आता शिवसेना आक्रमक झालेली दिसत आहे.

कोल्हापुरातील सेंट्रल बस स्टॅन्ड परिसरात कर्नाटक राज्यातल्या एसटी बसेस अडवण्यात येत आहेत. दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने सेंट्रल बस स्टँड परिसरात निदर्शने सुरू आहेत.शिवसेनेच्या वतीने कर्नाटक एसटीवर भगवे झेंडे लावण्यात येत आहेत असून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा निषेध नोंदवला जात आहे. या प्रकारामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटण्याची शक्यता आहे. 

 

 

मराठी ST चालकाच्या तोंडाला का काळं फासलं?
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाला कन्नड येत नसल्याने चक्क त्याच्या तोंडाला काळे फासल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिवाय, बसला देखील काळे फासले आहे. चालकाला गाडीतून खाली ओढत त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

कर्नाटकमधील चित्रदुर्गजवळ हा संतापजनक प्रकार घडला. संबंधित घडलेली माहिती चालकाने कोल्हापूर विभागीय कार्यालयाला दिली आहे. मुंबईवरून बंगळुरला जाणारी एसटी महामंडळाची बस प्रवाशांना घेऊन जात होती. ही बस चित्रदुर्गजवळ येताच कन्नड कार्यकर्त्यांनी या बसला अडवलं. तसेच कन्नडमध्ये घोषणा द्यायला सुरूवात केली.

चालकाला बसमधून खाली खेचत त्याच्याशी हुज्जत घातली. तुम्हाला कर्नाटकमध्ये यायचं असल्यास, तुम्हाला कन्नड यायलाच पाहिजे, असा वाद घालण्यास सुरुवात केली. मात्र, हुल्लडबाज कन्नड कार्यकर्त्यांनी एसटी (ST) चालकाच्या तोंडाला काळे फासले आणि एसटीलाही काळा रंग फासला. कोल्हापूर विभागातील भास्कर जाधव असं या चालकाचं नाव आहे.

Advertisement

Advertisement