Advertisement

 महाराष्ट्र केसरी कुस्तीची फायनल पुन्हा होणार का?

प्रजापत्र | Tuesday, 18/02/2025
बातमी शेअर करा

मुंबई : महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari) स्पर्धेच्या गादी विभागातील अंतिम लढतीच्या निकालावरून वाद झाला होता. या कुस्तीच्या निकालाबाबत चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने समिती नेमली आहे. ही केवळ पंचांच्या कामगिरीबाबत चौकशी करून अहवाल देणार आहे. या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची फायनल पुन्हा खेळवण्यात येणार का, याबाबतचा निर्णय आता राज्य संघटेनने घेतला आहे.

 

गादी विभागाच्या अंतिम फेरीत (Prithviraj Mohol) पृथ्वीराज मोहोळ आणि (Shivraj Rakshe) शिवराज राक्षे ही कुस्ती झाली होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय पंच नितेश कावुलिया (छत्रपती संभाजीनगर) हे मुख्य पंच होते. त्याचबरोबर दत्तात्रय माने हे मॅट चेअरमन आणि विवेक नाईकल हे साईड पंच होते. या कुस्तीच्या निकालावरून वाद झाला, असे राज्य कुस्तीगीर संघाने या चौकशी समितीचे प्रमुख विलास कथुरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

'या निकालाच्याविरुद्ध शिवराज राक्षे यांनी आजपर्यंत कोणतीही तक्रार केलेली नाही. मात्र, या निकालाबाबत होत असलेल्या चर्चेचा विचार करून कुस्तीगीर संघाने ही समिती नेमली आहे,' असेही या पत्रात म्हटले आहे. या समितीत दिनेश गुंड (पुणे) सुनील देशमुख (जळगाव), नामदेव वडरे (सांगली) आणि विशाल वलकवडे (नाशिक) यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र केसरीची फेरलढत होण्याचा प्रश्नच येत नाही, असे राज्य कुस्तीगीर संघाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, पंचांच्या कामगिरीची चौकशी करण्यासाठी ही समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालानुसार कोणताही निकाल बदलणार नाही किंवा फेरकुस्तीही होणार नाही. कोणत्याही ठिकाणी त्याबाबतची तरतूद नाही, असे राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस योगेश दोडके यांनी सांगितले.
 

Advertisement

Advertisement