Advertisement

लाडक्या बहिणींचे बहुतांश अर्ज टप्याटप्प्याने बाद होणार

प्रजापत्र | Monday, 17/02/2025
बातमी शेअर करा

मुंबई दि.१७(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki bahin yojana)योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या उधळपट्टीला लगाम घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकार योजनेसाठीच्या निकषांची कठोर अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे सध्या लाभ घेत असलेल्या अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत.
विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या आणि ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. 

महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे की नाही,(Ladki bahin yojana) हे शोधून काढण्यासाठी प्राप्तीकर विभागाची मदत घेतली जाणार आहे.
आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून महिन्यात ई-केवायसी द्यावे लागणार आहेत. तसेच हयातीचा दाखला म्हणजे लाईफ सर्टिफिकेटही महिलांना जमा करावे लागणार आहे. यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात पाठवले जातील.लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील तब्बल २ कोटी ६३ लाख लाडक्या बहि‍णींनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ कोटी ४१ लाख महिला पात्र ठरल्या होत्या. अजूनही ११ लाख अर्जांची आधारशी जोडणी प्रलंबित आहे. ज्यांचे आधार कार्ड कनेक्ट होणार नाही, त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत.राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात ५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवले होते. यापैकी अनेक महिलांनी सरकारचे नियम कठोर झाल्यानंतर स्वत:हूनच आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, असे अर्ज केले होते.संजय गांधी निराधार योजना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचाही लाभ घेत असलेल्या २.३ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते.(Ladki bahin yojana)याशिवाय, सरकारच्या विविध योजनांमधून १५०० किंवा त्यापेक्षा अधिक आर्थिक लाभ घेणाऱ्या महिलांना आता लाडक्या बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील तब्बल साडेसहा लाख लाभार्थी हे नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना, या दोन्ही योजनांचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. नमो शेतकरी योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांना १००० रुपये मिळतात. त्यामुळे आता संबंधित लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचे केवळ ५०० रुपयेच देण्यात येतील.लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आधीच्या महिन्यांचा म्हणजे जुलैपासूनच लाभ न देता अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील महिन्यापासून पैसे मिळतील.

 

Advertisement

Advertisement