बीड दि.११ (प्रतिनिधी)- केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder case) यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी अद्यापही फरार असताना आता या सर्वच आरोपींना मोक्का (MCOCA) लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विधीमंडळ सभागृहात याबाबतची घोषणा केली होती. त्याची आज अंमलबजावणी करण्यात आली.
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे, प्रतीक घुले व सिद्धार्थ सोनवणे हे सध्या अटकेत आहेत. तर कृष्ण आंधळे हा अद्यापही फरार आहे. त्याचा शोध बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची तिन्ही पथक घेत आहेत. तर दुसरीकडे अटकेत असलेले आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याने त्यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या दरम्यान आज विष्णू चाटे याला न्यायालयात हजर करण्यात आले असून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्याची पोलिस कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना सभागृहात या हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आज करण्यात आली. आता या सर्व आरोपींवर मोक्का लावला असल्याची माहिती सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.