Advertisement

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा शासन आदेश जारी

प्रजापत्र | Wednesday, 08/01/2025
बातमी शेअर करा

 मुंबई - मायबोली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा शासन आदेश जारी झाला आहे. आज (दि. ८) दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना अधिसूचना दिली.

 

 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला होता. मात्र, त्याची अधिसूचना निघालेली नव्हती. आज दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली. मंत्री शेखावत यांनी अधिसूचना उदय सामंत यांना दिली. यावेळी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ उपस्थित होते.

 

 

शासन आदेशाचा जीआर मिळाल्यानंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. "आमचं अभिजात भाषेच स्वप्न आज पुर्ण होत आहे. मराठी अभिजात भाषेचा हातामध्ये जीआर मिळणे हे माझे भाग्य आहे. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करू," असे ते म्हणाले.

कोणत्याही अभिजात भाषेला दर्जा देण्यासाठी केन्द्र सरकारचे काही निकष आहेत. भाषेचे वय, त्या भाषेमध्ये श्रेष्ठ साहित्य निर्मिती, भाषेमध्ये खंड जरी पडला तरी मूळ रूप आणि त्यामध्ये संगती असावी, तिचे अस्तित्व स्वतंत्र असावे, असे हे निकष आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी २०१७ मध्ये मंत्रिमंडळाच्या मसुद्यावरील आंतर-मंत्रालयीन सल्लामसलत करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर अभिजात भाषेसंबंधी निकष काय असावेत यासंबंधी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय निर्णय घेते. आतापर्यंत ज्या भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यांची नोंद भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने आजपर्यंत संस्कृत, तेलुगू, तामीळ, मल्याळम, कन्नड, उडीया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

 

 

अभिजात भाषेच्या दर्जामुळे कोणते फायदे मिळतात ?

अभिजात भाषेतील अभ्यासकांना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.

अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येते.

प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केले जाते.

Advertisement

Advertisement