कोणत्याही गोष्टीची कसलीही खातरजमा करायची नाही आणि कुठे काही ऐकले की त्याची पोस्ट करत त्या पुढे फिरवत रहायच्या याची जणू सध्या सर्वत्र लाट आहे. यातूनच सामाजिक संतूलन बिघडत जाईल असे प्रकार घडत आहेत. धादांत खोट्या गोष्टी पसरविण्याचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असताना या सोशल मीडियाला अंकुश लावता येईल अशी कोणतीच यंत्रणा आज तरी प्रभावीपणे काम करत आहे असे चित्र नाही.
धाराशिव जिल्ह्यातील कोणत्या तरी सरपंचाचे अपहरण झाल्याची पोस्ट कोणीतरी करतो आणि काही काळात त्याच्या लगेच बातम्या होतात, त्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहतात मग त्या घटनेच्या अनुषंगाने काही राजकीय नेत्यांच्या नावाची चर्चा होते आणि दुसर्या दिवशी असे काही घडलेच नव्हते, शस्त्र परवान्यासाठी स्वतः सरपंचानेच तो बनाव केला होता हा प्रकार समोर येतो. मात्र या सर्व काळात समाजात लगेच त्या सरपंचाची जात कोणती आणि त्याला खंडणी मागणार्यांची जात कोणती याच्या चर्चा सुरू झालेल्या असतात. यातून जो द्वेष वाढतो त्या द्वेषाचे करायचे काय? हे झाले एक उदाहरण पण मागच्या काही काळात सातत्याने ठिकठिकाणी हेच सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण काय पसरवित आहोत याचे थोडेही भान समाज मनाला राहिलेले नाही. सोशल मीडियावर रोज कोणत्यातरी पोस्टचा रतीब घातलाच पाहीजे त्याशिवाय खाललेले पचणार नाही असे समजणारी एक जमात सध्या सोशल मीडियावर सक्रीय असून त्या जमातीचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे. या पलिकडे जावून स्वतःचे अस्तित्व काय याची देखील माहिती नसणारे केवळ कुठल्या तरी द्वेषाच्या किंवा लाळघोटेपणाच्या भावनेतून ज्या काही पोस्ट टाकत आहेत त्या पोस्ट समाजाला कोणत्या वळणावर घेवून जात आहेत हे देखील कोणी पहायला तयार नाही. समाज माध्यमांमध्ये वावरताना प्रत्येकाला आपल्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहेच त्यामुळे त्याने काय पोस्ट करावी हा त्याचा किंवा तिचा अधिकार आहे हे मान्य केले तरी अभिव्यक्तीसध्या माध्यमांचे प्रवाह देखील वाढले आहेत. माध्यमांच्या पद्धती वाढल्या आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी या सोशल मीडियामधील पोस्टच्या देखील बातम्या होत आहेत. त्या पोस्टची कोणतीही खातरजमा न करता थेट बातमी करून ती पुढे ढकलण्याची जी स्पर्धा लागलेली आहे, त्याचेही कोठेतरी सर्वच माध्यमांनी आत्मपरिक्षण करणे अपेक्षीत आहे. माध्यमे असतील किंवा सोशल मीडिया या मंचाचा वापर लोक जोडण्यासाठी करणे अपेक्षीत होते. ज्यांना आवाज नाही त्यांचा आवाज होण्याचे काम या वेगवेगळ्या मंचांनी करणे अपेक्षीत होते. पण या मंचांचा वापर सामाजिक द्वेषासाठी कसलीही आवई उठविण्यासाठी केला जात असेल तर ते पुढच्या पिढीसाठी अधिक घातक आहे. त्यासाठीच भारतीय न्याय संहितेत, भारतीय नागरी सुरक्षा संहितेत ज्या काही कठोरातल्या कठोर तरतूदी अशा अफवा पसरविणार्या माध्यमविरांच्या विरोधात वापरता येतील त्या वापरून का होईना या अतिरेकाला आवर घातला जायला हवा.