अंबाजोगाई दि.२६ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारीचा प्रश्न आता अधिक चिंताजनक बनू लागला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दर्शविणारी आणखी एक घटना समोर आली आहे. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील पोलीस चौकीच्या समोरच (दि.२५) रोजी रात्री ९.३० च्या सुमारास एका तरुणावर चौघांनी चाकू,कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
अधिक माहिती अशी कि,शहरातील जमीर उर्फ मुन्ना मोहिद्दीन शेख (रा.सदर बाजार,अंबाजोगाई) असे त्या जखमी तरुणाचे नाव आहे. जमीरचा भाऊ शेख मतीनच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (दि.२५) रात्री ९.३० च्या सुमारास श्रीहरी दौलत मुंडे (रा. क्रांती नगर, अंबाजोगाई) हा जमीरला दारू पिण्यासाठी आग्रह करत होता. यावेळी जमीरने त्यास नकार देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर रात्री १२.३० च्या सुमारास जमीर स्वाराती रूग्णालयासमोरील चौकात बसला असताना श्रीहरी मुंडे याने त्यास पोलीस चौकीजवळील एटीएम समोर बोलावले. जमीर तिथे जाताच श्रीहरीने शिवीगाळ का केली होतीस असा जाब विचारत जमीरच्या मानेवर चाकूने वार केला तर आर्यन मांदळे व अनोळखी दोघांनी कोयता आणि चाकूने जमीरवर प्राणघातक हल्ला केला असे फिर्यादीत नमूद आहे. सदर फिर्यादीवरून श्रीहरी मुंडे, आर्यन मांदळे व अनोळखी दोघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या जमीरवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पोलीस चौकीसमोर झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.