Advertisement

रिंगणात अनेक, चर्चा मात्र पाच जणांची 

प्रजापत्र | Saturday, 16/11/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. १५ (प्रतिनिधी) : बीड विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीतील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे आता येथील लढतीच्या चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूकीच्या रिंगणात अनेकजण असले तरी चर्चा मात्र केवळ पाच जणांची आहे.
बीड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत सुरुवातीला ही निवडणूक बहुरंगी होईल असे वाटत होते. मात्र प्रचाराचे दोन टप्पे संपून आता निवडणूक अंतिम टप्प्यात आल्यावर लढत मर्यादित झाली आहे.
महायुतीचे डॉ. योगेश क्षीरसागर, महाविकास आघाडीचे आ. संदीप क्षीरसागर, अपक्ष असलेले अनील जगताप, ज्योती मेटे यांच्यातील लढतीची चर्चा असतानाच अपक्ष असलेले भागवत तावरे यांचे  'जहाज' किती पल्ला गाठणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
बीड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बऱ्यापैकी जातीय वळणावर जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकित हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या मागे ठामपणे उभा राहिला होता, पण आताचे चित्र वेगळे आहे. अपक्ष म्हणून रिंगणात असलेले अनील जगताप, ज्योती मेटे, भागवत तावरे युती आघाडीपैकी कोणाच्या मतांना किती सुरुंग लावतात आणि त्यांची धाव किती लांबपर्यंत जाते यावर सारीच समीकरणे अवलंबून आहेत.
मतदारसंघात सुमारे ३ लाख ८४ हजार मतदार आहेत. सुमारे ७०℅ मतदान झाले तर हा आकडा २ लाख ६० हजाराच्या पुढे जाईल. त्यामुळे एकुण लढतीचे चित्र पाहता ७५ हजाराचा आकडा पार करु शकणाऱ्या उमेदवाराला विजयश्री खुणावेल अशी परिस्थिती आहे.

Advertisement

Advertisement