बीड दि. १४ (प्रतिनिधी ) : एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उद्या मारून उमेदवारी मिळविता येते , काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून आपण कसे पक्षाचे लाडके आहोत असा भास निर्माण करता येतो, मात्र त्यामुळे लगेच कोणी नेतृत्वाच्या जवळ जात नसतो. त्यातही नेता जर राज ठाकरेंसारखा असेल तर ते कोणालाही जागा कशी दाखवून देतात हे सध्या केज विधानसभा मतदारसंघात दिसत आहे. या मतदारसंघातील उमेदवारासाठी ठरविलेली सभा राज ठाकरेंनी अचानक रद्द केल्याने यामागील 'राज 'कारण नेमके काय याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.
केज विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार असलेल्या नमिता मुंदडा आणि मुंदडा कुटुंबाचे राज ठाकरे यांच्या कुटुंबाशी असलेले राजकारणाबाहेरचे संबंध साऱ्या राज्याला माहित आहेत. त्यामुळे मनसे केज विधानसभेतून उमेदवार देणार यामुळेच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मनसेचा जिल्ह्यात प्रभाव असला तरी हा प्रभाव वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या गटातटात विभागला गेला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राजकारणात आज इथे तर उद्या तिथे असा प्रवास करणाऱ्या, मतदारसंघात कमी आणि इतरत्र जास्त वर असलेल्या , अगदी काही दिवसांपर्यंत उमेदवारीसाठी इतर पक्षाचे दरवाजे वाजविणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी मिळवून देण्यासाठी स्थानिकांच्या काही पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आणि त्या व्यक्तीच्या पदरात उमेदवारीची माळ घातली. आता पक्षाने उमेदवारी तर दिली, पण हा उमेदवार पक्षाचा वाटायला तर हवा ना, त्यासाठी म्हणे राज ठाकरे स्वतः प्रचारसभा घेणार होते. केजमध्ये या सभेची जय्यत तयारी करण्यात आली होती. तसे साऱ्या महाराष्ट्राला भल्या पहाटेच राज ठाकरेंचा हा दौरा रद्द झाल्याचे समजले होते, पण उमेदवार आणि त्यांच्या जवळच्यांना मात्र दुपारपर्यंत सभा होणार असे वातावरण तयार केले होते. मात्र अखेर ना टाकलेल्या खुर्च्या भरल्या, ना राज ठाकरे आले. यातून त्यांनी उमेदवाराला देखील जागा दाखवून दिल्याची चर्चा सध्या होत आहे.