बीड दि. १४ (प्रतिनिधी ) : विधानसभा निवडणुकीत भाजकडून 'बटेंगे , कंटेंगे ' संस्कृती लादली जात असतानाच महायुतीचा घटक असलेल्या अजित पवारांनी 'असले बटेंगे कंटेंगे महाराष्ट्रात चालणार नाही ' असे ठणकावले असतानाच आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या आ. पंकजा मुंडेंनी देखील 'बटेंगे , कंटेंगे चा प्रचार आपल्याला मान्य नाही ' अशी जाहीर भूमिका घेत भाजपला घरचा आहेर दिला आहे. मात्र यामुळे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या 'प्रसंगी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन सामान्यांचे हित साधायचे ' यांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
भाजप आणि अल्पसंख्यांक समाज यांचे तसे फारसे संख्या कधीच नव्हते. तरीही महाराष्ट्रात अल्पसंख्यांक समाजाने दिवंगत गोपीनाथ मुंडेंवर भरभरून प्रेम केले, ते त्यांच्या सर्वसमावेशक भूमिकांमुळेच . अल्पसंख्यांक समाजाला गोपीनाथ मुंडेंच्या कमळापासून कधी 'खतरा ' वाटला नाही, किंबहुना गोपीनाथ मुंडे त्यांना कायम आश्वासक वाटायचे. विषय अल्पसंख्यांकांच्या असेल किंवा ओबीसींचा, गोपीनाथ मुंडेंनी प्रसंगी पक्षाच्या भूमिकेला छेद देत सामान्यांच्या हिताचे रक्षण करणारी भूमिका घेतली होती. आता पंकजा मुंडेंच्या भूमिकेने पुन्हा गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने 'बटेंगे कंटेंगे ' चा प्रचार उत्तरेत सुरु केला आहे. भाजपचे अनेक नेते तोच प्रचार महाराष्ट्रात देखील करीत आहेत. भाजपचा हा प्रचार 'सेक्युलर ' मतांवर लक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मानवणारा नाही, त्यामुळे अजित पवार काय किंवा धनंजय मुंडे काय, यांनी या प्रचाराला थेट विरोध केला, मात्र आता पंकजा मुंडे या स्वतः भाजपच्या आमदार असल्या तरी त्यांनी 'आपल्याला बटेंगे , कंटेंगे चा प्रचार मान्य नाही, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आपली संस्कृती ' असल्याची जाहीर भूमिका घेतली आहे. त्यामुळे दिवंगत गोपीनाथ मुंडेंची आठवण अल्पसंख्यांक समुदायाला होणे स्वाभाविक आहे. बीड जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाज तसा गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या कुटुंबाच्या मागे उभा राहिलेला आहे. किंबहुना या समुदायाने दिवंगत गोपीनाथ मुंडेंना अडचणीच्या काळात बळ दिले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना या समुदायाची साथ मिळू शकली नव्हती. पंकजा मुंडे स्वतः चांगल्या असल्या आणि त्यांच्यापासून 'खतरा' वाटत नसला तरी नरेंद्र मोदींनी अंबाजोगाई येथे घेतलेल्या सभेत जी काही वक्तव्ये केली त्याचा परिणाम म्हणून अल्पसंख्यांक समाज पंकजांपासून दुरावला होता. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी घेतलेली भूमिका आता गोपीनाथ मुंडेंमधला ठामपणा दाखविणारी ठरत आहे.