बीड: बीड (beed) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीतुन उमेदवारी मागे घेतल्यानंतर आता माजी मंत्री (Jaydatta Kshirsagar) जयदत्त क्षीरसागर यांनी आपली राजकीय भूमिका जाहिर केली आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुतणे महायुतीचे उमेदवार (dr.yogesh Kshirsagar)डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय जाहीर केली. यामुळे डॉ. योगेश क्षीरसागर यांचे बळ वाढले आहे.
जयदत्त क्षीरसागर यांनी (press conference) पत्रकार परिषदेत ही भूमिका जाहीर केली.
तत्पूर्वी डॉ. योगेश क्षीरसागर यांनी क्षीरसागर परिवार सर्वांना सोबत घेऊन राजकारण करीत आला आहे. आम्ही ज्येष्ठांकडे पाहून त्यांच्याकडून राजकीय सामाजिक धडे घेत आलो आहोत असे सांगितले. थोरल्या घराचा मान सन्मान राखण्याचं कर्तव्य माझं असून आज परिवार एकत्र आल्याचा आनंद सर्वांना असल्याचेही ते म्हणाले.
जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) म्हणाले पांगलेली घरं, दुभंगलेली मनं आज एकत्र आलीत. जाती धर्मातलं पांगलेपण जोडण्याचे सुत्र काकूंनी जपले. तो वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक होते. तुमचे समर्थन मला होते, लोकांची इच्छा होती. पण काही समीकरणांमुळे कोणाला न सांगता अंतर्मनाने जे सांगीतलं त्यातून उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. अवमेळात मेळ आणावा म्हणून, परिवार एकत्रित करण्याचा भाग म्हणून, आपल्या सर्वांच्या विस्तारित परिवाराचे हित जपायचे म्हणून उमेदवारी परत घेऊन (dr.yogesh Kshirsagar) डॉ. योगेश क्षीरसागरांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता आपल्याला पुढे जायचे आहे. सर्वांनी आता कोणत्याही किंतु, परंतु, कुजबुजीच्या आहारी न जाता योगेश क्षीरसागरांना साथ द्यावी असे आवाहन केले. मी आणि योगेश कायम संपर्कात राहू, म्हणूनच आपला माणूस, हक्काचा माणूस म्हणून योगेशच्या मागे उभे रहावे असे आवाहन केले.
या पत्रकार परिषदेला उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. विठ्ठल क्षीरसागर,विजुताई महिंंद्रे, डॉ. सारिका क्षीरसागर, रोहित क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, बाबुसेठ लोढा, गंगाधर घुमरे, जगदीश काळे, विलास बडगे,गणपत डोईफोडे, सुधाकर मिसाळ, बप्पासाहेब घुगे, तानाजी कदम यांची उपस्थिती होती.