बीड : साधारण ९० चे दशक ज्याला आठवते , त्याला अल्ताफ राजाचे गाणे चांगलेच आठवतात , तेच हो 'तुम तो ठहरे परदेशी ' वाले . त्यात एक शेर आहे, 'उम्मीदे वफा रक्खे क्या उनसे भला कोई , कपडो की तरह रोजाना जो चेहरे बदलते है ' . आता आज अचानक या गाण्याची आठवण व्हायला कारण देखील तसेच आहे. निवडणुकीची रणधुमाळी म्हटलं की चेहरे बदलणारे लोक असणारच , पण हे चेहरे बदलावेत तरी किती ? एका पक्षाचा जिल्ह्याचा 'राजा ' असणाऱ्या व्यक्तीला आता दुसऱ्या पक्षात जिल्ह्याचा 'राजा ' व्हायचंय आणि त्यासाठी श्रेष्ठींना 'मस्का ' मारणे देखील सुरु आहे, मात्र याच व्यक्तीने मागच्या पंधरा दिवसात तीनवेळा आपली सोशल मीडियाची प्रोफाइल बदलल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता अल्ताफ राजाचे गाणे या राजासाठी तर नव्हते ना असा संशय बीडच्या जनतेला येत आहे.
बीड जिल्ह्यात राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. कोणाची निष्ठा कधी डळमळीत होईल आणि कोण कधी कुठे जाईल हे सांगणे तसे अवघड. बरे राजकारणात आपला प्रभाव आपल्या स्वतःच्या गावात देखील नसला आणि स्वतः ज्या पक्षाचे जिल्ह्याचे 'राजे ' आहोत, त्या पक्षाच्या उमेदवाराला स्वतःच्या गावात मताधिक्य देता येत नसले , तरी मुंबईत 'मस्का' मारून पद पदरात पडून घेण्याचे स्वप्न कोणी पाहत असेल तर त्याला म्हणायचे तरी काय ?
ज्यांच्यापासून आपली राजकीय सुरुवात झाली, त्यांच्याशीच 'संग्राम ' मांडून दुसऱ्या पक्षाची वाट धरली. तिथे जिल्ह्याचा 'राजा ' म्हणून काम सुरु केले, संघटनेचे काम किती झाले माहित नाही , पण गोपालनापासून ते छावणीपर्यंत काम करून नंतर त्या पक्षाला देखील सोडण्याची वेळ येईपर्यंत यांना 'शेतकरी मित्र ' होता आले होते. पहिल्यादा ज्यांच्या प्रोफाईलवर 'ताईसाहेब ' असायच्या, त्या प्रोफाईलवर नंतर 'दादा ' दिसायला लागले. मधल्या काळात त्या प्रोफाईलवर म्हणे 'मोठे साहेब ' दिसायचे, काही काळ हे चालले, पण आता त्या प्रोफाईलवर कोणीच नाही म्हणतात. अर्थात निवडणूक झाल्यानंतर का होईना सध्या जिथे प्रवेश झालाय त्या पक्षाचा जिल्ह्याचा 'राजा ' होण्याचे स्वप्न मनात आहेच. त्यासाठी काय काय 'संघर्ष ' या योद्ध्याला करावा लागेल माहित नाही, पण हे सारे बदल पाहून सामान्यांना मात्र अल्ताफ 'राजा' आठवतोय ...
बातमी शेअर करा