Advertisement

ताई जिल्ह्यात येणार तरी कधी ?

प्रजापत्र | Saturday, 09/11/2024
बातमी शेअर करा

बीड  : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या , या राज्याच्या माजी मंत्री, आ. पंकजा मुंडे यांचे सध्या झंझावाती प्रचार दौरे सुरु आहेत . पुणे जिल्हा काय, मुंबई काय आणि आणखी कुठे काय, पंकजा मुंडेंच्या सभांना मागणी मोठी आहे आणि गर्दी देखील मोठी आहे म्हणतात . आपल्या 'ताईसाहेब ' आता पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाल्याचा आनंद त्यांच्या समर्थकांना आहेच, पण त्याच समर्थकांना प्रश्न पडलाय बीड जिल्ह्याचे काय ? ताईसाहेब राज्य गाजवून बीडला येणार तरी कधी ?
 बीड जिल्हा हा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा. राज्यात युतीच्या राजकारणाची सुरुवात झाली ती ९० च्या विधानसभेला , त्या काळात म्हणजे ९५ पर्यंत युतीमध्ये वरचढ असायची ती शिवसेना . मात्र नंतर परिस्थिती बदलत गेली आणि युतीमध्ये बीड जिल्ह्यात भाजपचं मोठा झाला. इतका की शिवसेनेच्या वाट्याला उरला केवळ एक मतदारसंघ. आणि अशा पद्धतीने बीड जिल्हा झाला गोपीनाथ मुंडेंचा, पर्यायाने भाजपचा बालेकिल्ला . ही घोषणा प्रत्येक निवडणुकीत कायम चर्चेत असायची. यंदा मात्र परिस्थिती बदलली , युतीची महायुती झाली, अनेक राजकीय समीकरणे उलटीपालटी झाली. बीडमधील सहापैकी केवळ दोनच मतदारसंघात आता 'कमळ ' चिन्ह आहे. अगदी दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या परळीमध्ये देखील मतदानयंत्रावर 'कमळ ' नाही. पण मतदानयंत्रावर 'कमळ ' नसले तरी कमळाला मानणारे कार्यकर्ते तर जिल्ह्यात सर्वत्र आहेतच ना ... त्यांना आता आपल्या 'ताईसाहेबांची ' प्रतीक्षा आहे.
आ. पंकजा मुंडे अर्थात ताईसाहेब भाजपमध्ये तशा मागच्या पाच वर्षातच उपेक्षितच होत्या. परळी विधानसभा निवडणुकीत २०१९ ला पराभव काय झाला, भाजपने त्यांच्याकडे जणू दुर्लक्ष केले . पंकजा मुंडेंनी अनेकदा कधी रागाने तर कधी प्रेमाने  आपली नाराजी बोलूनही दाखविली. कधी 'हा पक्ष माझ्या बापाने मोठा केला ' असे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत . पण भाजपने त्यांना दीर्घकाळ प्रतीक्षा करायला लावली . आता भाजपवरच 'आमचा डीएनए ओबीसींचा आहे ' असे म्हणण्याची राजकीय अपरिहार्यता आली  आणि भाजपला पंकजा मुंडेंची आठवण करावीच लागली. त्यांना अगओड्र आमदार केले गेले आणि आता  त्या भाजपसाठी राज्यात फिरत आहेत. त्यांच्या सभा कधी पुण्यात, कधी हवेलीत, कधी मावळात तर कधी मुंबईत होत आहेत. त्यांच्या सभांना गर्दी कशी होते आणि त्यामुळे वातावरण कसे बदलते याच्या नुसत्या चर्चा ऐकूनच त्यांच्या समर्थकांचा उर भरून येत आहे, पण त्यांना एका प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही. आपल्या ताईसाहेब बीड जिल्ह्यात येणार तरी कधी?
नसतील यावेळी भाजपच्या जास्त जागा जिल्ह्यात, केवळ दोनच जागांवर कमळ असले म्हणून काय झाले, महायुती चे इतरही उमेदवार तर त्यांचेच आहेत ना? त्यांच्या प्रचाराचे काय ? लोकसभेत ज्यांनी ज्यांनी जे काही केले, त्यांचा हिशोब करायचा तरी कसा ? आता जिथे वर्षानुवर्षे घड्याळीला विरोध करण्यात गेली तिथे घड्याळीचा प्रचार करताना मतदारांना सांगायचे तरी नेमके काय ? या साऱ्यांचे 'बौद्धिक ' ताईसाहेबांशिवाय घेणार तरी कोण ? म्हणूनच राज्यात सभा गाजवीत असलेल्या पंकजा मुंडे बीड जिल्ह्यात कधी येणार याची प्रतीक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांना तर आहेच पण महायुतीच्या नेत्यांना देखील असणारच की ...

Advertisement

Advertisement