Advertisement

काय सांगता ...? दादा म्हणे भावुक झाले...

प्रजापत्र | Thursday, 07/11/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. ६ (प्रतिनिधी ) : अश्रूंमध्ये मोठी शक्ती असते म्हणतात, एकदा अश्रू ओघळले की मन कसं मोकळं होतं . ते जस सामान्यांचं होतं , तसेच राजकारण्यांच देखील होतं असावं . म्हणूनच दोन दिवसांपूर्वी माजलगावचे दादा म्हणे भावुक झाले आणि ते देखील पुरुषोत्तमाच्या भूमीत . त्यांच्या डोळ्यातून भावुकतेने काही अश्रू देखील ओघळले म्हणतात. आता त्या अश्रूंमध्ये नेमकं काय काय धुऊन जाणारं आणि राजकारणापायी कोंदटलेलं आभाळ मोकळं होऊन खरोखर त्यांना वि'जयाचा' प्रकाश दिसणार का याची चर्चा मात्र कार्यकर्ते करीत आहेत.

 

माजलगाव मतदारसंघाचे अनेकवेळा प्रतिनिधित्व केलेले आणि तसे तर मागच्या निवडणुकीतच 'ही आपली शेवटची निवडणूक ' अशी घोषणा करून मोकळे झालेले , पण या निवडणुकीत पुन्हा पुतण्याला बाजूला सारून नव्या उमेदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले प्रकाश सोळंके म्हणजे माजलगावचे दादा . आता दादा नावच इतकं भारदस्त की त्यांना कधी भावनिक होता येत असेल यावर कोणाचा सहजी विश्वासच बसणार नाही. त्यात त्यांचं एकूणच बोलणं म्हणजे 'हं.. बोला ' असं सरंजामी थाटातलं , त्यामुळे त्यांना कधी भावनिक झालेलं कोणी फारसं पाहिलं देखील नसावं . पण निवडणूक कोणाला काय काय दाखवील याचा काही नेम नाही. तर त्याच दादांना चक्क भावनिक झालेलं लोकांनी पाहिलं म्हणे . काहीजण तर भावनिकतेतून दादांच्या डोळ्यातून चक्क चार अश्रू देखील ओघळल्याचं सांगतात. सांगोत बिचारे . आता काही लोक म्हणतात म्हणजे असं घडलं असेल असं गृहीत धरायला देखील हरकत नाही . शेवटी माणूस आहे, भावनिक होणारच .
पण दादा  नेमकं भावनिक का झाले असतील ? ते देखील भगवान पुरुषोत्तमाच्या भूमीत ... नेमकं काय बरं आठवलं असेल दादाला ? याच भूमीतून आपण पुतण्याला राजकीय वारसदार जाहीर केलं होतं आणि नंतर मात्र आपण स्वतः निवडणुकीत उतरलो ते का पक्षानेच निर्णय घेतला असं आपण लोकांना सांगत होतो, पण अचानक कोना कार्यकर्त्याची अजित पवारांसोबतच्या कथित संवादाची व्हायरल झालेली ध्वनिफीत , पाठचा भाऊ असलेल्या धैर्यशील काकांनी आपल्यासाठी केलेला त्याग का त्याची परतफेड म्हणून सक्ख्या पुतण्याला अनुभवावी लागलेली 'झोनबंदी ' ? पाच वर्षांपूर्वीची स्वतःचीच भाषणं का पुतण्याच्या कार्यकर्त्यांनी सोशलमिडीयावर केलेला एल्गार , स्वतःपेक्षा पुतण्याचा फोटो बॅनरवर मोठा घ्यावा लागतोय यामुळे तर ते अश्रू ओघळले नसतील ना ? कारण काय असेल ते माहित नाही, पण दादा म्हणे भावनिक झाले ... आता त्या भावनिकतेतून यातले काय काय धुवून निघेल आणि नेमके कोणाकोणाच्या मनातले मळभ दूर होऊन दादांना पुन्हा विजयाचा प्रकाश दिसेल हे तर काळच ठरवेल. शेवटी काळाच्या उदरात डोकावणं  हे 'आपल्या'च लोकांचा 'करेक्ट कार्यक्रम' लावण्याइतकं सोप्प थोडीच असतं ... आंs s s

Advertisement

Advertisement