Advertisement

संपादकीय अग्रलेख-  जुन्या मालाचं नवीन ब्रॅण्डिंग

प्रजापत्र | Tuesday, 29/10/2024
बातमी शेअर करा

 पूर्वी म्हणजे मोबाईल आले त्या अगदी सुरुवातीच्या काळात चीनमधून माल आणायचा आणि त्याचे भारतीय कंपन्यांच्या नावे ब्रॅण्डिंग करून तो विकायचा असे एक फॅड सुरु झाले होते, आता राजकारणात ते फॅड आल्याचे चित्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. कोणत्याही पक्षातून उमेदवार आयात करायचा आणि त्याला आपल्या पक्षाचे ब्रॅण्डिंग करून मैदानात उतरवायची पद्धत सर्वच राजकीय पक्षांनी आणली आहे.
 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत बहुतेक जागांवरील महायुती आणि महाविकास आघाडी यांचे उमेदवार ठरले आहेत. तिसऱ्या आघाडीने देखील अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. प्रहार, वंचित यांच्या उमेदवारांकडे सर्वांचेच विशेष लक्ष आहे. मात्र काही अपवाद वगळता बहुतांश राजकीय पक्षांच्या उमेदवारी यादीवर नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षाने दिसते, ती म्हणजे या याद्यांमधील बहुतांश चेहरे हे कोठून तरी आयात केलेले आहेत. एकेकाळी राजकारणात आयाराम गयाराम संस्कृतीवर टीका तरी व्हायची, मात्र आता तशीही परिस्थिती राहिलेली नाही. आता कोणत्याच राजकीय पक्षाला ऐनवेळी आलेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्याबद्दल काहीच वावगे वाटत नाही. याला डावे पक्ष अपवाद आहेत, नाहीच असे नाही, मात्र या विधानसभा निवडणुकीत त्यांचा आवाज फारसा दिसायला तयार नाही.
आयुष्य एखाद्या वेगळ्या पक्षात काढायचे आणि तो मतदारसंघ आपल्याला मिळत नाही असे वाटले की लगेच टोकाची वेगळी विचारधारा असलेल्या पक्षात प्रवेश करायचा , त्यासाठी पुन्हा मतदारसंघाचा विकास वगैरे गोष्टींचा मुलामा द्यायचा याची आता राजकारण्यांना इतकी सवय झाली आहे, की असे करताना त्यांना थोडेही बुजल्यासारखे  होत नाही. एखाद्या व्यक्तीचा अर्ध्या तासापूर्वी प्रवेश घ्यायचा आणि त्याला लगेच उमेदवारी द्यायची असे प्रयोग भाजप, शिवसेना यांच्यासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील केले आहेत. ज्या पक्षांना मोठमोठ्या पक्षफुटीला सामोरे जावे लागलॆ त्यांना देखील पुन्हा आयारामांना पायघड्या घालाव्या लागतात याला राजकीय अपरिहार्यता म्हणायचे का काय म्हणायचे हा प्रश्न आहेच. नाही म्हणायला शरद पवारांनी काही ठिकाणी , जसे की बीड, निष्ठावंत हाच निकष लावला. बीड, केज , आष्टी येथील उमेदवारांवर नजर टाकल्यास ते दिसते , पण हे अपवादानेच . अनेक ठिकाणी तर खूप लोकांनी प्रवेश केले, मात्र उमेदवारी एकालाच, आता ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांना पुन्हा चार दिवसातच 'वेगळी वाट ' निवडावी लागत आहे.
कोठून तरी कोणता तरी कच्चा माळ आणायचा आणि त्याची आपल्या नावे ब्रॅण्डिंग करण्याची पद्धत पूर्वी औद्योगिक जगतात होती, आताही काही ठिकाणी आहे, पण आता ती पद्धत महाराष्ट्राच्या राजकीय जगताने उचलली आहे. यातून मतदारांसमोरचा संभ्रम मात्र वाढत आहे. अशा ब्रॅण्डिंग मधून समोर येणार चेहरा , त्या पक्षाच्या विचारधारेशी, तत्वांशी किती प्रामाणिक असेल याची चर्चा देखील करण्याचे काही कारण आता उरलेले नाही. या निवडणुकीत दिसतोय तो केवळ बाजार. 

Advertisement

Advertisement