Advertisement

महायुती आणि आघाडीत काट्याची टक्कर तसेच मराठा, ओबीसी फॅक्टर देखील राहणार महत्वाचे

प्रजापत्र | Saturday, 19/10/2024
बातमी शेअर करा

 बीड : विधानसभेचे सहा मतदारसंघ असलेल्या बीड जिल्ह्यात मागच्या दोन विधानसभा निवडणूकांमध्ये कधी भाजपचा तर कधी राष्ट्रवादीचा (एकत्र असताना ) प्रभाव राहिलेला आहे. शिवसेनेच्या वाट्याला येथील एकच मतदारसंघ यायचा, त्यातही त्यांना मागच्या दोन निवडणूकांमध्ये विजय मिळविता आला नव्हता, तर काॅंग्रेसचा विधिमंडळाच्या राजकारणात जिल्ह्यात फारसा प्रभाव नाही. आता यावेळीही बहुतांश ठिकाणी लढती भाजप विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी, किंवा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशाच होतील असे चित्र आहे. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी याला जोडूनच सहाही मतदारसंघात मराठा आणि ओबीसी फॅक्टर प्रभावी ठरणार आहेत.
बीड जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. हा जिल्हा एकेकाळी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला होता तर शरद पवारांनी देखील अनेकदा या जिल्ह्यात धक्का देणारे राजकारण केलेले आहे. त्यामुळे तसा या जिल्ह्यावर शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांचा प्रभाव राहिलेला आहे. आता पूर्वी  शरद पवार यांच्यासोबत असणारे अनेकजण अजित पवार यांच्यासोबत असून त्यामुळे महायुतीचा भाग झालेले आहेत. तर शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा कार्यकर्ता अशी महाविकास आघाडी समोरासमोर उभे असल्याचे चित्र आहे. तरी खरी लढत मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप किंवा राष्ट्रवादी  विरुद्ध राष्ट्रवादी अशी असणार आहे.
 

 

२०१४ मध्ये होता भाजपचा बोलबाला
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन झाल्यानंतर झालेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात भाजपचा बोलबाला असल्याचे चित्र होते. जिल्ह्यातील सहापैकी पाच जागा भाजपने चांगल्या फरकाने जिंकल्या होत्या. त्यावेळी सर्वच पक्ष वेगळे लढले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतविभाजनाचा फायदा देखील भाजपने उचलला होता. त्यात पंकजा मुंडे (परळी ), आर. टी. देशमुख (माजलगाव ), लक्ष्मण पवार (गेवराई ), भीमराव धोंडे (आष्टी ), संगीता  ठोंबरे (केज ) या पाच जागा भाजपच्या निवडून आल्या होत्या, तर बीडमध्ये राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर विजयी झाले होते. साडेचार वर्षानंतर त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला होता.  २०१४ च्या निवडणुकीत धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, नमिता मुंदडा , सुरेश धस , बदामराव पंडित आणि दिवंगत विनायक मेटे यांना पराभव पत्करावा लागला होता.
 

 

२०१९ ने दिले मात्तबरांना धक्के
२०१९ ची विधानसभा निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरली होती. १४ ला चारही पक्ष वेगळे लढले होते, मात्र १९ ला भाजपसेना युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी करून लढले. मात्र यावेळी जिल्ह्याचे चित्रच पालटले. २०१४ ला ५ जागा जिंकणाऱ्या भाजपला १९ मध्ये केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. स्वतः पंकजा मुंडे यांचा परळीत धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला, तर बीडमध्ये सेनेच्या तिकिटावर उभ्या असलेल्या  जयदत्त क्षीरसागर यांचा त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला. आष्टीत भीमराव धोंडे   हे तत्कालीन आमदार पराभूत झाले. आष्टीत राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे तर केजमध्ये भाजपकडून नमिता मुंदडा विजयी झाल्या. माजलगावमध्ये भाजपने तिकीट बदलले आणि रमेश आडसकर याना उमेदवारी दिली, मात्र येथून त्यांचा प्रकाश सोळंके यांनी पराभव केला. गेवराईत राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित यांचा पराभव करीत लक्ष्मण पवार यांनी भाजपची जागा राखली. भाजपला २ तर राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या. त्यातील तिघे जण राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजित पवार गटात गेले आणि एकटे संदीप क्षीरसागर (बीड ) शरद पवार यांच्यासोबत राहिले.

 

 

यावेळी प्रचंड अस्थिरता
२०२४ च्या निवडणुकीसाठी मात्र जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात अस्थिर चित्र आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनीही जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे ठरविले असले तरी अद्याप दोघांचेही जागावाटप आणि उमेदवार निश्चित झालेले नाहीत. अनेक चेहरे कुंपणावर असून ते ऐनवेळी कोणत्याही पक्षात उडी मारू शकतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कोणाचेच तिकीट (अपवाद वगळता ) निश्चित नाही अशी परिस्थिती आहे.
 

 

मराठा आणि ओबीसी , दोन्ही फॅक्टरचा प्रभाव
बीड जिल्ह्याचे राजकारण तसे बहुतांश वेळा ओबीसकेंद्री राहिलेले होते. येथे मराठा नेतृत्व असले तरी दीर्घकाळ सत्तेचे केंद्र मात्र ओबीसीकडे राहिलेले आहे. त्यामुळे मराठा समाजाची एक राजकीय खदखद देखील नेहमीच राहिलेली आहे. त्यातच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव म्हणून जिल्ह्यात मराठा समाज राजकीयदृष्ट्या एकत्र आल्याचे चित्र लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले, त्यातूनच लोकसभेला पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, अर्थात त्यासाठी मराठा मतांना मुस्लिम समाजाची जोड मिळाली हे देखील विसरता येणार नाही. आता पंकजा मुंडे यांचा पराभव हा ओबीसींवरचा आघात असल्याचा भाव ओबीसी समूहाचा आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी दोन्ही फॅक्टर सारखेच प्रभावी राहणार आहेत.

Advertisement

Advertisement