मुंबई - विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधार्यांनी आता आपापल्या पक्षातील नाराजांना खुश करण्याचा निर्णय घेतला असून आचारसंहितेच्या पूर्वसंध्येला अनेक महामंडळांच्या घोषणा केल्या आहेत. यात राष्ट्रवादीचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्याकडे ओबीसी महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांना विधानपरिषदेवर संधी दिली जाईल असे अपेक्षित होते. त्यांना पक्षाकडून तसा शब्द देखील देण्यात आला होता असे सांगितले जाते. मात्र राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत त्यांचा समावेश झाला नाही. त्यामुळे आखाडे समर्थक नाराज होते. आता कल्याण आखाडे यांना ओबीसी महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्यात आल्याची माहिती आहे.
आचारसंहितेच्या अगोदर सरकारने वेगवेगळ्या महामंडळांवरील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत . यात कल्याण आखाडे यांना ओबीसी महामंडळावर संधी देण्यात आली आहे. कल्याण आखाडे हे सावता परिषदेचे संस्थापक असून सध्या राष्ट्रवादीच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून ओबीसींमधील आपला जनाधार आणखी बळकट करण्याचा प्रयत्न पक्षाचा असणार आहे.