बीड दि. १५ (प्रतिनिधी ) : राज्यात सरकारमधील मंत्री सरकारी तिजोरी आपल्या निकटवर्तीयांवर लुटविण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ लागले असून रोजगार हमी योजना विभागात खाजगी कंपनीमार्फत नोकर भरती केली जात आहे. या कंपन्यांच्या तुंबड्या भरता याव्यात म्हणून आवश्यकता नसताना देखील जिल्ह्यांना मनुष्यबळ निर्माण करण्यात आले असून त्या ठिकाणी कंपनीने बेरोजगारांना नियुक्त्या दिल्या आहेत. बीड जिल्ह्यात एसएस या कंपनीकडून नरेगासाठी ४० पेक्षा अधिक लोक पाठविण्यात आले असून आता त्यांना सामावून तरी कोठे घ्यायचे आणि काम काय द्यायचे हा प्रश्न प्रशासनासमोर आहे.
राज्यात रोहयो मार्फत नरेगाच्या अंमलबजावणी करण्यासाठी खाजगी कंपनीमार्फत मनुष्यबळ पुरविले जात आहे. यासाठी खाजगी कंपनीला सरकारकडून गलेलठ्ठ मानधन दिले जात आहे. यातील कंपन्यांचे लागेबांधे कोणाशी आहेत हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आता या कंपन्यांचा फायदा व्हावा म्हणून आवश्यकता नसतानाही मंत्रालयात बसून प्रत्येक जिल्ह्यात मनुष्यबळ निर्मिती करण्यात आली. कोणत्याही जिल्ह्याकडून मागणी, प्रस्ताव नसताना केवळ कंपनीचे भले करायचे म्हणून हे मनुष्यबळ निर्माण करण्यात आले आहे. आणि त्यानुसार खाजगी कंपनीने आता थेट बेरोजगारांना वेगवेगळ्या जिल्ह्यात नियुक्त्या दिल्या आहेत. बीड जिल्ह्यात देखील अभियंता आणि ऑपरेटर अशा ४० पेक्षा अधिक लोकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात नरेगा विभागात यापूर्वीच अतिरिक्त मनुष्यबळ आहे. आहे त्या लोकांनाच काय काम द्यायचे आणि कोठे नियुक्ती द्यायची हा प्रश्न असताना आता नव्याने इतके लोक सामावून घ्यायचे कोठे हा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
मागच्या काही दिवसांपासून खाजगी कंपनीने दिलेले नियुक्ती आदेश घेऊन हे लोक रोहयो कार्यालयात येरझाऱ्या मारत आहेत , पण या लोकांना नियुक्ती तरी द्यायची कोठे हा प्रश्न असल्याने त्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.
आकृतिबंध वाऱ्यावर
शाकीय कार्यालयात खाजगी यंत्रणेमार्फत मनुष्याला घ्यायचे म्हटले तरी किती पदांची आवश्यकता आहे याचा आकृतिबंध आवश्यक असतो आणि त्यानुसारच खाजगी, कंत्राटी भरती केली जाते. मात्र जिल्ह्याला न विचारताच अशी पदे परस्पर निर्माण केली जात आहेत. यातून केवळ खाजगी कंपन्यांचा फायदा करून दिला जात आहे.