बीड दि. १3 (प्रतिनिधी ) : बीड विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र अजूनही स्पष्ट व्हायला तयार नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून विद्यमान आमदार तथा जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांना अंतर्गत विरोध असला तरी त्यांना मात्र पक्षाच्या तिकीटाची खात्री आहे, त्यांच्या पक्षातून भागवत तावरे, बी.बी. जाधव यांचीही मोर्चेबांधणी सुरु आहे.तर दुसरीकडे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर जोरदार तयारीला लागले आहेत. त्यांनी लढण्याचे स्पष्ट संकेत देखील दिले आहेत. बीड मतदारसंघ क्षीरसागर मुक्त करण्याच्या घोषणा अनेकांनी केल्या आहेत आणि त्यासाठीच क्षीरसागरांच्या विरोधात 'मराठा तितुका मेळवावा' म्हणत एकच उमेदवार देता येतो का याच्या हालचाली सुरु आहेत , आता त्याला किती यश येणार यावर बीडची लढत तिरंगी का बहुरंगी हे ठरणार आहे.
बीड विधानसभा मतदारसंघाचे राजकारण दीर्घकाळ क्षीरसागर कुटुंबाभोवती फिरत आले आहे. कधी कोणत्या तरी एका क्षीरसागरांच्या बाजूने तर कधी क्षीरसागर नको अशाच मुद्द्यावर येथील निवडणुका सहसा होतात. आताही परिस्थिती फारशी वेगळी नाही. फरक आहे तो इतकाच , मागच्या निवडणुकीला दोन असलेल्या क्षीरसागर कुटुंबाच्या राजकीय चुली आता तीन झाल्यात आणि म्हणूनच आता क्षीरसागरांना रोखता येईल अशी विरोधकांची भावना बळावली आहे.
आ. संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा चेहरा आहेत. मात्र त्यांना पक्षातूनच विरोध होतोय, खुद्द जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे हे भागवत तावरे यांच्यासाठी बॅटिंग करताना दिसतायत , मागच्या काळात अनेक लोक आ. संदीप क्षीरसागर यांना सोडून गेल्याचे पक्षाला सांगितले जात आहे . मात्र असे असले तरी पक्ष आपल्यालाच उमेदवारी देणार असा ठाम विश्वास आ. संदीप क्षीरसागरांना आहे आणि 'भूमिका ' म्हणून मतदान करणारा मतदार आपल्यासोबत राहिल हा विश्वास देखील आहे. दुसरीकडे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीनिशी तयारीला लागा असे संकेत दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आज तरी किमान दोन क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट आहे.
महायुतीमध्ये हा मतदारसंघ कोणाला सुटणार हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते बीडला येऊन हा मतदारसंघ आपलाच असे सांगत असून अनिल जगतापांनी चांगलीच कंबर कसली आहे त्याबरोबरच मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय बाजीराव चव्हाण यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून योगेश क्षीरसागर यांना उमेदवारीची खात्री आहे. शेख तय्यब यांना नुकतेच अल्पसंख्यांक महामंडळावर घेण्यात आले आहे. तरीही योगेश क्षीरसागर, शेख तय्यब आणि गेलाबाजार फारूक पटेल देखील रस्सीखेचीच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे महायुतीची परिस्थिती एक अनार सौ बिमार अशी झाली आहे. त्यापलीकडे जाऊन माजी मंत्री सुरेश नवले , शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केलेली आहेच. अशावेळी सर्व मराठा उमेदवारांना क्षीरसागर कुटुंबाच्या विरोधात ' एकत्र आणून एकाच्याच मागे शक्ती उभी करण्याच्या हालचाली काहींनी सुरु केल्या आहेत. मात्र क्षीरसागर विरोधकांत किती एकमत होईल त्यांना किती यश येते हे आज सांगणे आजही अवघड आहे. एकूणच बीड मतदारसंघात कधी नव्हे इतका राजकीय संभ्रम निर्माण झालेला आहे.