Advertisement

ताईंच्या कानपिचक्या कोणाला ?

प्रजापत्र | Monday, 14/10/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. १3 (प्रतिनिधी ) : अपेक्षेप्रमाणे भगवान भक्तीगडावरचा आ. पंकजा मुंडेंचा मेळावा चर्चेतला ठरला. मेळाव्याला खुद्द धनंजय मुंडेंची उपस्थिती होती म्हणून तर मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष होतेच, पण यावर्षी प्रथमच बीड जिल्ह्यात नारायणगडावर मनोज जरांगे यांचा मेळावा झाल्याने सावरगावला मुंडे बहीण भाऊ काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे धनंजय मुंडे यांचे भाषण भारी झालेच , पण यावेळी आ. पंकजा मुंडेंचा आवेश नेहमीपेक्षा वेगळा होता. आपल्या भाषणातून आ. पंकजा मुंडेंनी उपस्थितांमध्ये ऊर्जा तर भरलीच, पण अनेक कानपिचक्या देखील दिल्या. आता या कानपिचक्या नेमक्या कोणाला होत्या याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे .

 

 

आ. पंकजा मुंडेंचा मेळावा आणि गर्दी हे तसे समीकरणच झालेले. पंकजा मुंडे मंत्री होत्या तेव्हाही , कोणत्याच संवैधानिक पदावर नसतानाही आणि आता आमदार असतानाही, पंकजा मुंडेंच्या मेळाव्यासाठी येणारी गर्दी कायम तशीच असते . तसेही पंकजा मुंडे तसे स्पष्ट बोलणाऱ्या. राजकारणात इतका स्पष्टपणा अनेकदा अडचणींचा ठरतो, पण पंकजा मुंडे स्पष्ट बोलत आल्या आहेत . यावेळी तर त्यांच्या मेळाव्याला राज्यातील मंत्री असलेले भाऊ धनंजय मुंडे उपस्थित होते . त्यामुळे पंकजा मुंडे काय बोलतील याची उत्सुकता होती. पण पंकजांनी चौफेर फटकेबाजी केली . आता त्या मनमोकळं बोलल्या , त्यांनी समोरच्यांना विचारले, 'माझ्या काळात किती पीक विमा आला, आता कुठेय विमा?' आता लोकांनी उत्तर द्यायचं तरी काय . 'मी कधी अधिकारी, कर्मचाऱ्यांची, कार्यकर्त्याची जात पाहून नियुक्ती दिली नाही , चुकीच्या  लोकांचे समर्थन केले नाही . पाप करणाराला माफ केलं नाही ' असं आणि असलंच खूप काही पंकजा मुंडे बोलल्या . अर्थात ते खरंही आहेच.  आजही गावागावात पंकजा मुंडेंच्या पालकमंत्रीपदाची कारकीर्द आठवली जातेच. पण पंकजा मुंडेंचे हे बोल काहींना मात्र कानपिचक्यांसारखे वाटतात त्याला आ. पंकजा मुंडेंनी तरी  काय करावे . आपल्या काळात आपण शेतकऱ्यांचे , कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविले , आता त्यांचे प्रश्न कायम आहेत असेही पंकजा मुंडे बोलून गेल्या, मग हे प्रश्न सोडवायला , विमा, अनुदान मिळवून द्यायला, चुकीच्या नियुक्त्या रोखायला नेमकं कमी पडलं तरी कोण? आ. पंकजा मुंडेंच्या भाषणात सामान्यांप्रतीची तळमळ होतीच , पण त्यांचे हे बोल कोणाला मळमळ व्हायला भाग पाडणार असतील तर त्याला पंकजा मुंडे काय करणार, त्या तर पडल्या स्पष्टवक्त्या....

Advertisement

Advertisement