बीड दि.३ (प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील पोलीस दलात खांदेपालट होण्यास सुरुवात झाली आहे.आष्टी पोलीस ठाण्याच्या प्रमुखपदी असलेल्या सोमनाथ जाधव यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्या ठिकाणी शरद भुतेकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर वादाच्या भोवऱ्यात असलेल्या चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी नारायण एकाशिंगे यांना देखील हटविण्यात आले असून जिल्हा विशेष शाखेतून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना त्या ठिकाणी देण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी हे आदेश काढले.
चकलांबा पोलीस ठाण्यातील सपोनि नारायण एकशिंगे यांच्या बाबतीत मागील काही दिवसांपासून रोष वाढलेला होता. लाचखोरप्रकरणामुळे ही चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रकरण गाजले होते. याशिवाय पत्रकार मारहाणीच्या घटनेचा देखील एसपी यांना भेटून पत्रकार संघाने निषेध नोंदविला होता. त्यामुळे चकलांबा पोलीस ठाणे प्रमुखांची उचलबांगडी करून त्याठिकाणी जिल्हा विशेष शाखेतून सपोनि संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तर काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात दाखल झालेले पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांना आष्टी पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.नारायण एकशिंगे यांना वाचक उपविभागीय गेवराई तर सोमनाथ जाधव यांना नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.
बातमी शेअर करा