केज दि.२७ (प्रतिनिधी ) - धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणात आवक वाढून लातूर, धाराशिव आणि बीड (beed)या तीन जिल्ह्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेले (Manjara Dam) मांजरा धरण शंभर टक्के भरले आहे. संततधार पाऊस आणि आवक लक्षात घेता शुक्रवारी (दि.२७ ) पहाटे धरणाचे एकूण सहा वक्रदरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे मांजरा नदी पात्रात ५ हजार २४१ क्युसेक (१४८. ४४) इतका विसर्ग सूरू असल्याची माहिती धरणाचे शाखाधिकारी सूरज निकम यांनी दिली.
धाराशीव जिल्हातील कळंबच्या दाभा व केज तालुक्यातील धनेगावच्या सिवेवर १९८० साली मांजरा नदीवर मांजरा प्रकल्पाची (Manjara Dam) बांधणी झाली. यानंतर या प्रकल्पात प्रथमतः १९८०-८१ हंगामात पाणीसाठा झाला. तो ९७ दलघमी इतका होता. यानंतर पुढील ४४ वर्षाच्या काळात हा प्रकल्प धाराशीव जिल्हातील कळंब, (beed)
बीड जिल्ह्य़ातील केज, अंबाजोगाई व लातूर जिल्ह्य़ातील लातूर व रेणापूर तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरत आला. याशिवाय लातूर शहर, लातूर औद्योगिक वसाहत, कळंब, केज, अंबाजोगाई, धारूर, मुरूड अशा शहरासह शेकडो गावातील पाण्याचा प्रश्न भागवणारा प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जाते.
नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे
जलाशयातून तब्बल ५ हजार २४१ क्युसेक विसर्ग करण्यात आल्याने मांजरा नदीला पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राकेश गिड्डे, तहसीलदार, केज