Advertisement

खाकीचा धाक निर्माण करण्यात एसपींना यश

प्रजापत्र | Friday, 27/09/2024
बातमी शेअर करा

 समीर लव्हारे
बीड दि-अविनाश बारगळ यांनी जिल्ह्यात पोलीस अधिक्षक म्हणून जबाबदारी घेण्यापूर्वी घडलेल्या घटना कायदा सुव्यवस्थेला सरळ-सरळ आव्हान देणाऱ्या होत्या.अवैध धंदे,अवैध दारू याबद्दल पोलीस अधिकारीच काय, सामान्य जनतेला देखील काही वाटत नाही इतका याबाबतीतला कोडगेपणा समाजातच निर्माण झाला होता.त्यापलीकडे जाऊन वर्णन करायचे झाले तर गुन्हेगारीचे वाढलेले प्रचंड प्रमाण,अगदी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर झालेला चाकूहल्ला किंवा महिला आणि वंचित घटकांवर सातत्याने होणारे अत्याचार असतील.अगदी चोरीच्या घटनांची तर गणतीच नव्हती अशी परिस्थिती जिल्ह्याची होती.यात पूर्णतः बदल जरी आजघडीला झाला नसला तरी अविनाश बारगळ यांनी पदभार घेतल्यापासून खाकीचा धाक निर्माण करण्यात त्यांना काही प्रमाणात यश आलाय.विशेष करून बाळराजे दराडे यांनी अवैध धंद्यांविरोधात रोजच सुरु केलेल्या कारवायांची मोहीम आज जिल्हयातच चर्चेचा विषय ठरू लागलीय.एसपींच्या मोकळीकतेचा अधिकाऱ्यांना गुन्हेगारांवर वचक मिळविण्यासाठी कसा फायदा होतो हे दराडेच काय अनेक अधिकाऱ्यांच्या कारवायांतून आज अधोरिखित होते.बाळराजे दराडे हे यातील एक उदाहरण.  
              बीडमध्ये अविनाश बारगळ यांनी पदभार घेऊन जेमतेम दीड महिने झाले असतील.तर ग्रामीण पोलीस ठाण्यात नियुक्ती होऊन बाळराजे दराडे यांना महिनाही उलटला नाही.मात्र एसपींच्या मोकळीकतेचा फायदा घेण्यात दराडेंना चांगलेच यश आले आहे.कारण अल्पावधीत अवैध दारू,पेट्रोलची बेकायदेशीर विक्री,गुटख्याची तस्करी,हवाला रॅकेट आणि आता वाळू माफियांकडे त्यांनी वळविला मोर्चा गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण करणारा ठरतोय. कारण दराडे यांनी महिन्याभराच्या आताच केलेल्या कारवाया ग्रामीण पोलीस ठाण्याला चर्चेत आणणाऱ्या ठरल्यात. एरव्ही कधीतरी कारवायांचा मूड असलेल्या ठाण्यात आता रोजच गुन्हे दाखल होऊन कारवाया होणार असतील तर याचे श्रेय एसपी आणि कारवाया करणाऱ्या अधिकाऱ्याला द्यावे लागेल.

 

कारण बीड जिल्ह्याला गुंडगिरी काही नवीन नाही, गुंडगिरी केली तर कारवाई होईल अशी भीति येथे कधी तरी असायची. मधल्या काळात तर ती भीति देखील संपत चालल्याचे चित्र होते.जिल्ह्यात मटका,जुगार,अवैध वाळू,गल्लीबोळातील कट्टे यासोबतच इंधन माफिया देखील चांगलेच फोफावले होते. जनावरांची होणारी बेकायदा कत्तल असेल किंवा कुंटणखाने,नशेचा व्यापार असेल किंवा आणखी काही,अमुक एक प्रकारचा गुन्हा जिल्ह्यात घडत नाही असे म्हणायला जागा राहिलेली नव्हती.अश्या परिस्थिती बारगळ यांनी पदभार घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना कारवायांसाठी दिलेल्या इशारा आज जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करू पाहतो.त्यात ज्या अधिकाऱ्यांना बीडमध्ये येऊन एक महिनाही झाला नाही ते दराडेंसारखे अधिकारी जर चांगले काम करणार असतील तर त्यांच्या कामाचीही चर्चा होणारच.अर्थात याचे सर्व श्रेय जाते ते एसपींना.कारण त्यांनी स्वतः सामान्यांच्या जीव टांगणीला लागलेल्या मल्टिस्टेटप्रकरणात धडक मोहीम हाती घेत आपल्या भूमिका मागेच स्पष्ट केल्या आहेत.त्यामुळे आता अधिकारीही ऍक्शनमोडमध्ये आले असून डागाळलेल्या खाकीला पुन्हा लकाकी मिळू पाहतेय. 

Advertisement

Advertisement