मुंबई- 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहिना दीड हजार आणि वर्षाला तीन मोफत सिलिंडर देण्याची घोषणा राज्य सरकारने केली.
या घोषणेला महिनाभराचा कालावधी उलटला; परंतु अजूनपर्यंत योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे 'लाडक्या बहिणीं'ना लाभाची प्रतीक्षाच आहे. गरीब व गरजू महिलांचे सक्षमीकरण व्हावे, तसेच त्यांना आरोग्य जपण्यासाठी आर्थिक साहाय्य लाभावे, यासाठी राज्य शासनाच्या वतीने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना लागू केली. जुलै व ऑगस्ट महिन्याचे अर्थसाहाय्य महिलांच्या बँक खात्यात वळते करण्यात आले; परंतु त्यानंतर घोषणा केलेल्या मोफत सिलिंडरचा लाभ अजूनपर्यंत महिलांना देण्यात आलेला नाही. सदर लाभ कधी मिळणार, याची प्रतीक्षा लाभार्थी महिलांना आहे. अनेक नागरिक गॅस एजन्सीत सिलिंडरबाबत चौकशी करीत आहेत. शासनाने लवकर मोफत सिलिंडर योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महिलांनी केली.