सय्यद दाऊद
बीड दि. २४ : मुस्लीम भाजपाला मतदान करतंच नाही असा निरेटिव्ह तयार केला. यामुळे बऱ्याच ठिकाणी भाजपाचा उमेदवार या मतदारांकडे दुर्लक्ष करतो. परंतु याला अपवाद राहिले आहेत दिवंगत गोपीनाथराव मुंडे, माजीमंत्री सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार आणि जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा हे बीड जिल्ह्यातील नेते अन् मुस्लीम मतदार यांचे नाते. हे निवडणुकीत उभे असताना मुस्लिमांनी कधीच पक्ष बघितला नाही. फक्त समोरील उमेदवाराचा चेहरा हाच पक्ष आणि चिन्ह समजून मतदान केले. या नेत्यांनीही सर्वसमावेशक विचार करत मुस्लिमांना सोबत घेऊन विकासकामात सामावून घेतले. यामुळे भाजपात असूनही बीड जिल्ह्यातील मुस्लिमांचे आवडते चेहरे म्हणून यांच्याकडे पाहिले जाते.
बीड जिल्हाच नव्हे तर देशातील राजकारण वरवर विकासाच्या मुद्यावर चालत असल्याचे बोलले जाते परंतु भारतात राजकारण जातीच्या आधारावर चालत हे अलिखित सत्य आहे. काही पक्षतर केवळ जातीच्या मुद्यावर टिकून आहेत. यासाठी सर्वात सोपा मार्ग हा मुस्लीम आणि दलितांना टार्गेट करणे हा आहे. परंतु दलित संघटना आता आक्रमक झाल्या असून शिक्षणामुळे जागरूकता आल्याने तसेच त्यांना ॲट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण असल्याने त्यांच्याबाबतीत सॉफ्ट कॉर्नर सध्या दिसून येत आहे. पण भाजपा सत्तेत आल्यापासून मुस्लिमाविरुध्द बोलण्याची स्पर्धा लागलेली दिसत आहेत. यामध्ये भाजपा आमदार,मंत्री, माजीमंत्री हे राजकीय चेहरे आहेत पण काही महाराज म्हणून घेणारेही भाजपाकडून सुपारी घेऊन मुस्लीम विरोधात उघडपणे बोलत आहेत. यामुळे मुस्लीम भाजप आणि त्यांच्या नेत्यांपासून हाताचे अंतर ठेवून रहात आहे. पण अशी परिस्थिती असलीतरी दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांना कधीच मुस्लिमांनी भाजपात असूनही नाकारले नाही. मुंडे हाच पक्ष समजून डोक्यावर टोपी घालून त्यांच्यासाठी खांद्यावर भाजपाचे चिन्ह असलेला झेंडा घेण्यात कधीच गैर वाटले नाही. त्यांनीही कधी पक्षाचा अजेंडा राबवत मुस्लिमांना अडचणीत आणण्याचा अथवा त्यांच्या विरोधात एकतर्फी वक्तव्य केले नाही. हीच त्यांची जादूची कांडी होती की, मुस्लीम त्यांना भरभरून मतदान करत होता अन् निकालातून सर्वांचे अंदाज फेल होत असे, यानंतर ही जागा आता आष्टी मतदारसंघात माजी मंत्री सुरेश धस, गेवराईत आमदार लक्ष्मण पवार आणि केज मतदारसंघात जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी घेतली. या तीनही नेत्यांना मुस्लीम मतदार आपलं समजतो सुरेश धस यांच्याकडे मुस्लीम कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा आहे. तर सामान्य मतदारही मोठ्या विश्वासाने आमदार धस यांच्याकडे आपली कामे घेऊन येतात आणि ते ज्या निवडणुकीला उभे असतात त्यावेळी अथवा ते सांगतील त्या उमेदवाराला मतदानही करतात. गेवराई मतदारसंघात आमदार लक्ष्मण पवार यांनाच आपला नेता मानून मुस्लिमांनी त्यांना कमळाचे चिन्ह असतानाही मतदान करत त्यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे याची गेवराई विधानसभा मतदारसंघात उघडपणे चर्चा होते. केज विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर कोणत्याही अडचणीत काकाजी हा हक्काचा एकमेव चेहरा दिसतो. तीस-चाळीस वर्षांच्या मुंदडा यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक समाजाची कामे केली आहेत. भाजपात असूनही त्यांनी कधीही मुस्लीम आणि त्यांच्यात अंतर पडू दिले नाही. मतदारसंघात कुठेही इज्तेमा असु दे अथवा संदल, उरुस तिथे नंदकीशोर मुंदडा हे उपस्थित असतातच. मुस्लीम मतदान करीत नाही म्हणून त्यांनी कधीही तक्रार केली नाही अथवा विकास निधी देताना हात आखडता घेतला नाही. त्यांनाही केज मधील मुस्लीम मतदार स्वीकारतात हे अनेक निवडणुकीतून दिसून आले आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील हे भाजपात असलेले चार चेहरे नेहमीच आवडीचे ठरले असून, यावरुन मुस्लीमांचा भाजपाला नव्हे तर जातीयवादी व एकतर्फी राजकारण करणाऱ्यांना विरोध असल्याचे दिसून येत आहे.

प्रजापत्र | Wednesday, 25/09/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा