Advertisement

आठवण पाऊण लाखाचा ऐतिहासिक विजय

प्रजापत्र | Friday, 20/09/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. १९ (प्रतिनिधी ) :लोकसभा, विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि बीड जिल्ह्यातील चौसाळा मतदारसंघ संपुष्टात  आला,तर रेणापूर मतदारसंघाचे रूपांतर परळी मतदारसंघात झाले. ते वर्ष होते २००९ चे . त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत गोपीनाथ  मुंडेंनी केंद्रीय राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते खासदार म्हणून निवडणून देखील आले होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर बीडमधून उभे राहिले , त्याचवेळी राज्यात रिडालोसचा प्रयोग करण्यात आला होता. त्यावेळी जयदत्त क्षीरसागर यांनी तब्बल पाऊण लाख मतांच्या फरकाने शिवसेनेचे उमेदवार असलेल्या सुनील धांडे यांचा पराभव केला होता .
२००९ ची विधानसभा निवडणूक बीड मतदारसंघासाठी अनेक अंगानी महत्वाची अशी राहिली . २००४ मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे सुनील धांडे आमदार झाले होते. सुरेश नवले यांच्यानंतर शिवसेनेला प्रथमच या मतदारसंघात संधी मिळालेली होती. सुनील धांडे त्या अगोदर  प्रदीर्घकाळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेले होते, त्यांचा संपर्क दांडगा होता आणि त्यातूनच ते २००४ ला बीडमधून आमदार झाले. त्याच निवडणुकीत चौसाळा मतदारसंघातून जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला होता. तेव्हापासूनच जयदत्त क्षीरसागर बीड मतदारसंघात येणार अशा चर्चा होत्या. मतदारसंघ पुनर्रचनेत चौसाळा मतदारसंघ रद्द झाला आणि अपेक्षेप्रमाणे बीड मतदारसंघातून राष्ट्रवादीने जयदत्त क्षीरसागर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी राजकारणात प्रदीर्घकाळ क्षीरसागर कुटुंबियांसोबत असलेले, किंबहुना या कुटुंबाचे जवळचे म्हटले जाणारे सय्यद सलीम यांनी रिडालोसच्या माध्यमातून बंडखोरी केली. सय्यद सलीम हे क्षीरसागरांचे निष्ठावंत मानले जायचे, अगदी सय्यद  सलीम यांना काहीही विचारले तर ते 'अण्णा को पुछता ' असे म्हणतात अशी देखील चर्चा त्यावेळी मतदारसंघात व्हायची १९९९ ला ते या मतदारसंघाचे आमदार होते, त्यावेळी त्यांनी माजलगाव बॅकवॉटरसाठी केलेले प्रयत्न मतदारांनी पाहिले होते. त्यामुळेही असेल कदाचित, सय्यद सलीम यांनी जी रिडालोसची वाट धरली, त्याला मतदारसंघातील क्षीरसागर विरोधकांचे प्रत्यक्ष बळ होतेच, त्यासोबतच पक्षातील क्षीरसागर विरोधकांची देखील अंधारातून साथ होतीच . त्यामुळे त्यावेळची निवडणूक तिरंगी झाली.
जयदत्त क्षीरसागर, शिवसेनेचे सुनील धांडे आणि रिडालोसचे सय्यद सलीम यांच्यात लढत झाली. त्यावेळी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात जी प्रचारसभा झाली, त्यात गोपीनाथ मुंडे सुनील धांडे यांच्या प्रचारासाठी आले होते , मात्र प्रचारसभेत बोलताना त्यांनी हातातील घड्याळ दाखविली असे सांगतात. बीडमतदारसंघातील एका मोठ्या समूहावर गोपीनाथ मुंडेंचा पगडा होता. त्यामुळे त्यांनी जे काही दाखविले त्याचाही व्हायचा तो परिणाम झाला असे सांगतात. ज्या क्षीरसागर विरोधकांनी सुरुवातीला सय्यद सलीम यांना साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या, ते ऐनवेळी गायब झाले आणि त्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांना एकट्याला १ लाख ९ हजार १६३ मते मिळाली . झालेल्या एकूण मतदानाच्या ५० % पेक्षा देखील अधिक असे हे मतदान होते. सुनील धांडे ३३ हजार २४६ तर सय्यद सलीम यांना ३२ हजार ९९९ मते मिळाली . जयदत्त क्षीरसागर यांचा पाऊण लाखाच्या मताधिक्याने विजय झाला. त्यावेळी आणि आताही विधानसभा निवडणुकीत इतके मताधिक्य म्हणजे राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरले होते. त्या निवडणुकीतील विजयाने जयदत्त क्षीरसागर मंत्री झाले तर या पराभवानंतर सय्यद सलीम आणि सुनील धांडे याना अद्यापतरी विधिमंडळात जाण्याची संधी मिळालेली नाही.

Advertisement

Advertisement