काय चाललंय जिल्ह्यात
बीड दि. १९ (प्रतिनिधी ) : राज्य विधानसभेच्या निवडणुकीची आचार संहिता पुढच्या पंधरवाड्यात लागेल असे संकेत मिळत असतानाच आता कोणत्या नेत्याचे राजकीय घट कुठे बसणार याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पितृपक्षात फार काही राजकीय घडामोडी करायच्या नाहीत असे संकेत अनेक राजकीय नेते पाळत असल्याने आता पितृपक्ष संपल्यानंतर म्हणजे नवरात्रात अनेकांचा राजकीय निर्णय होणे अपेक्षित आहे. बीडमधील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर , कुंडलिक खांडे , गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार , माजी आ. संजय दौंड यांच्यासह अनेकांच्या भूमिकांकडे आता जिल्ह्याचे लक्ष असेल.
बीड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना आता वेग येत असून महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होणार असली तरी या दोन्ही बाजूला ऐनवेळी अनेक चेहरे दिसू शकतील असे चित्र आहे. बीडचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मागच्या वेळी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर ते शिवसेनेपासून दुरावले मात्र त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही . मधल्या काळात त्यांची भाजपनेत्यांशी जवळीक वाढली होती, मात्र आता ते सर्वांपासुनच समान अंतर ठेवून आहेत . विधानसभेसाठी आता त्यांचे राजकीय घट कोणत्या ठिकाणी बसणार याची उत्सुकता त्यांच्या कार्यकर्त्यांसह सर्वांनाच आहे.
गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार सध्या भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. भाजपश्रेष्ठी आपल्या सूचनांची दखल घेत नाहीत आणि महायुतीमधला राष्ट्रवादी गेवराईत भाजपला वरचढ होत असल्याची सल त्यांनी बोलून दाखविली आहे. त्यांची विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा देखील भाजपला राम राम ठोकून इतरत्र जाण्याची पूर्वतयारी असल्याचे मानले जाते . त्यामुळे ते तुतारीच्या मार्गावर असल्याचे संकेत आहेत. परळीमधील माजी आ. संजय दौंड यांना विधानपरिषदेवर जाण्याची इच्छा आहे, मात्र ती जर फलद्रुप होणार नसेल तर ते कोणताही धाडसी वाटणारा निर्णय घेऊ शकतात . तसेच काहीसे माजलगाव मतदारसंघात होणार आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार असेल तर रमेश आडसकर , मोहन जगताप यांना कोणतीतरी सुरक्षित जागा शोधावी लागणार आहे. आष्टीमध्ये देखील काही नेत्यांना आपली जुनी पाळेमुळे विसरून इतरत्र कोठे तरी ठिकाण शोधावा लागेल असे चित्र आहे.
सध्या राजकीयदृष्ट्या रिकाम्या असलेल्या कुंडलिक खांडेंना मशाल खुणावत आहे, तर तुतारीच्या देखील त्यांना अपेक्षा आहे, मात्र त्यांचा निर्णय अजून झालेला नाही. या सर्वांनाच आता पितृपक्ष संपण्याची प्रतीक्षा असून या सर्वांचे राजकीय घट नेमके कोठे बसणार हे नवरात्रातच स्पष्ट होणार आहे.

बातमी शेअर करा