बीड दि. १८ (प्रतिनिधी ) : लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी बारामतीमध्ये केलेले भाषण शरद पवार यांना सर्वाधिक लागलेले आहे, आणि त्यामुळेच बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघावर शरद पवार स्वतः विशेष लक्ष देऊन आहेत. या मतदारसंघावर धनंजय मुंडे यांची पकड तेवढीच तगडी आहे, त्यामुळेच शरद पवारांना देखील याठिकाणी धनंजय मुंडेंच्या विरोधात कोणतेही अस्त्र विचार करून वापरावे लागणार आहे. आजच्याघडीला शरद पवारांच्या भात्यात राजाभाऊ फड , काँग्रेसला जागा देऊन राजेसाहेब देशमुख हे दृश्य पर्याय आहेत तर संजय दौंड आणि आ. पंकजा मुंडे यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भूमिकांवर देखील अनेक समीकरणे अवलंबून असणार आहेत.
विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी राज्यातील जे काही महत्वाचे मतदारसंघ आहेत , त्यापैकी परळी एक असणार आहे. असेही दिवंगत गोपीनाथ मुंडे विधानसभेच्या रिंगणात असतानापासून परळी (तेव्हाचे रेणापूर ) चर्चेत आहेच. त्यानंतर पंकजा मुंडे आणि सध्या धनंजय मुंडे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या मतदारसंघाचे प्रतिनिधी असलेले धनंजय मुंडे यांचे राजकीय प्रस्थ मागच्या काही वर्षात प्रचंड वाढले, अगदी राज्यातील काही मोजक्या नेत्यांमध्ये एक म्हणून धनंजय मुंडेंकडे पाहिले जाते. धनंजय मुंडेंना विश्वासात घेतल्याशिवाय किंवा त्यांचा विचार केल्याशिवाय राज्यातील सत्तासमीकरण पूर्ण होऊ शकत नाही हेच मागच्या पाच वर्षात राज्याने अनुभवले आहे.
असे असले तरी एकेकाळचे शरद पवारांचे लाडके असलेले धनंजय मुंडे आता मात्र शरद पवारांच्या टार्गेटवर आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीमध्ये एकदा नव्हे तर दोनवेळा धनंजय मुंडेयांनी अजित पवारांची पाठराखण केली, नव्हे या बंडाचे कर्तेकरविते धनंजय मुंडे होते हे आता सर्वज्ञात आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी बारामती मतदारसंघात केलेली भाषणे शरद पवार यांच्या जिव्हारी लागलेली आहेत. त्यामुळेच राज्यातील ज्या काही मोजक्या मतदारसंघात स्वतः शरद पवार यांनी लक्ष घातले आहे, त्यापैकी परळी हा एक ठरलेला आहे.
या मतदारसंघावर धनंजय मुंडे यांची पकड तशी तगडी आहे. धनंजय मुंडे हे जरी राज्याचे राजकारण करीत असले तरी वाल्मिक कराड यांच्या माध्यमातून मुंडे यांनी मतदारसंघाशी आपला कनेक्ट कायम ठेवलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघात त्यांना धक्का देणे तसे सोपे असणार नाही. त्यातच आता लोकसभा निवडणुकीनंट आणि त्यानंतर मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्याचे किमान सांगितले तरी जाते , त्यामुळे देखील धनंजय मुंडेंचे बळ वाढल्याचे चित्र निर्माण होते.
मात्र या मतदारसंघातील सामाजिक चित्र यावेळी धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढवू शकते. जरांगे फॅक्टर नेमका कसा प्रभाव करणार यावरही येथे खूप काही अवलंबून आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख येतुन इच्छुक असून त्यांनी तगडी मोर्चेबांधणी केली आहे. त्यांचा स्वतःचा मतदारसंघात संपर्क चांगला आहे. त्यातच जरांगे फॅक्टर त्यांच्या पथ्यावर पडेल असा त्यांना विश्वास आहे. सरकारबद्दल एकूणच असलेली नाराजी आणि इतर घटक देशमुख यांच्यासाठी सोयीचे ठरू शकजतात . दुसरीकडे राजाभाऊ फड यांनी सुद्धा सध्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. परळी नगरपालिका मुंडे यांच्यासाठी महत्वाची राहिलेली आहे, आता फड यांनी त्यावर आघात करणे सुरु केले आहे. राजाभाऊ फड हे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत, त्यांनी काही दिवसांपूर्वीच शहराद पवार यांची भेट घेतली आहे. राजाभाऊ फड यांना एकेकाळी पंजा मुंडेंचे निकटवर्तीय मानले जायचे, त्यामुळे फड यांनी सध्या जी आरोपांची आतिषबाजी सुरु केली आहे, त्याला दारुगोळा कोणाचा असेल हे वेगळे सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे माजी आ. संजय दौंड काय करणार हे देखील महत्वाचे ठरणार आहे. राज्यपाल नियुक्तीच्या माध्यमातून विधानमंडळात जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार नसेल तर ते शांत बसणार नाहीत इतके नक्की, त्यामुळे आजतरी शरद पवार यांच्या भात्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात अनेक अस्त्रे आहेत, त्यापैकी ते कोणते वापरणार हे काळ ठरवेल.
एक मात्र आहे. जसे बारामतीमध्ये पवार यांच्याकडे अस्मिता म्हणून पाहिले जाते आणि चंद्रकांत पाटलांनी 'पवारांचे राजकारण संपवायचा ' विडा बारामतीमध्ये उचलला त्याचा फटका महायुतीला बसला, तसेच परळीकरांना आता सत्ताकेंद्रात राहायची सवय लागलेली आहे. साऱ्या जिल्ह्याचे राजकारण परळीमधून हलवायचे हे आता परळीकरांच्या अगोदर पंकजा मुंडे आणि नंतर धनंजय मुंडे यांच्यामुळे अंगवळणी पडले आहे. त्यामुळे हे सत्ताकेंद्र इतर कोठे जाणे परळीकरांना रुचेल का याचा देखील अभ्यास शरद पवारांना करावा लागेल .
प्रजापत्र | Thursday, 19/09/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा